धुळे येथे कोरोनाबाधित रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍याकडून २ सहस्र रुपयांची मागणी !


धुळे – येथील एका खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍याने कोरोनाबाधित रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी २ सहस्र रुपये देण्याची मागणी केली होती. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित होत असून यात रुग्णालयातील कर्मचारी बेड मिळवून देण्यासाठी २ सहस्र रुपयांची मागणी करत असल्याचे दिसत आहे. या प्रकारानंतर धुळेकर संतप्त झाले आहेत.

या प्रसारित घटनेविषयी खासगी रुग्णालयाच्या प्रशासनाने ‘आधी चौकशी करू आणि नंतर बोलू’, असे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. या प्रकरणानंतर ‘रुग्णालयाचे प्रशासन संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करणार का ?’, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्हा दौर्‍यावर असतांना त्यांना याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले की, हा प्रकार वाईट आहे. सत्य असेल, तर नक्कीच कठोर कारवाई करू.