वर्धा येथील प्रशासनाचा भोंगळ कारभार ! रुग्णांच्या संदर्भात अक्षम्य हलगर्जीपणा करणार्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
वर्धा – जिल्ह्यातील वरूड येथील उपसरपंच आशिष ताकसांडे यांना त्यांच्या कुटुंबातील एका कोरोनाच्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी १० घंटे वणवण फिरावे लागले.
१. सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्यांच्या कुटुंबातील एका रुग्णास इंजेक्शनची आवश्यकता होती. कुटुंबीय रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी सावंगी येथून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले.
२. त्यांना औषध विभागप्रमुख वाळके यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांची शिफारस आणण्यास सांगितले. प्रथम ते सुट्टीवर असल्याचे उत्तर मिळाले; मात्र आप्तमंडळी थेट चिकित्सकाच्या दालनात गेल्यावर त्यांची डॉ. तडस यांच्यासमवेत भेट झाली. त्यांनी शिफारस केल्यावर आशिष यांचे कुटुंबीय वाळके यांच्याकडे पोचले.
३. औषध विभागप्रमुख वाळके यांनी परत उपजिल्हाधिकारी नितीन पाटील यांच्याकडे अनुमती देण्याचे अधिकार असल्याने त्यांना भेटण्यास सांगितले.
४. जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पाटील यांची भेट घेतल्यावर त्यांनी अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. ‘माझा संबंध नसून तुम्ही थेट जिल्हाधिकार्यांना भेटा’, असे त्यांनी सुचवले.
५. सकाळी ११ वाजल्यापासून कुटुंबियांची पायपीट चालू होती. दुपारी ४ वाजता ताकसांडे स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. उपजिल्हाधिकारी पाटील यांची ५ वाजता भेट झाली. ‘खरे काय ते सांगा, चकरा कशाला मारायला लावता’, असा जाब नातेवाइकांनी विचारला. पाटील यांनी डॉ. तडस यांना दूरभाषवरून खडसावले. ‘तुम्ही जिल्हा चिकित्सक आहात. माझ्याकडे रुग्णांच्या नातेवाइकांना कशाला पाठवता ? रुग्णांच्या आप्तांना माझी शिफारस आणायला सांगणारे हे वाळके कोण आहेत ?’ असा प्रश्न त्यांनी तडस यांना केला. पाटील यांनी या वेळी सामान्य रुग्णालयातूनच इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले.
६. त्यानंतर आशिष ताकसांडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती मोरे यांना भेटून अप्रसन्नता व्यक्त केली.
७. जिल्हा प्रशासनाने परत जिल्हा चिकित्सकाकडे जाण्यास सांगितले. ही मंडळी परत जिल्हा चिकित्सकाच्या दालनात पोचल्यावर या ठिकाणी खासदार रामदास तडस उपस्थित असल्याचे दिसले. ताकसांडे यांनी त्यांना विनंती केली. खासदारांनी औषध लगेच उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
८. परत औषध विभागप्रमुख वाळके यांच्याकडे सर्वजण पोचले. त्यांनी अर्धा घंटा चालढकल केल्यानंतर औषध उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.
९. इतका आटापिटा करून काहीच साध्य होत नसल्याचे दिसल्यावर धावपळ करणार्या आशिष ताकसांडे कुटुंबातील सदस्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. ताकसांडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना समवेत घेऊन औषध विभाग गाठला.
१०. त्यांनी वाळके आणि डॉ. तडस यांची कानउघाडणी केली. संतापजनक भावना व्यक्त केल्या. सर्वांनी चिकित्सक डॉ. तडस यांना अडवून धरले. ‘औषध द्या, मगच जा’, अशी भूमिका घेऊन आप्त अडून बसले.
११. या प्रकरणात शेवटी पोलिसांचा हस्तक्षेप अनिवार्य ठरल्यावर पोलीस निरीक्षक ब्राह्मणे रुग्णालयात आले. दिवसभर हेलपाटे घालणार्या रुग्णाच्या आप्तांविषयी पोलिसांनीही सहानुभूती दर्शवली. विनाकारण त्रास दिल्याविषयी आश्चर्य व्यक्त केले.
१२. पोलिसांनी समजूत घातल्यावर रात्री डॉ. तडस यांची सुटका झाली.
१३. ‘हा अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला लज्जास्पद ठरणारा प्रकार आहे. जिल्हाधिकार्यांनी केवळ आदेश काढून चालणार नाही, तर त्यांनी कार्यवाहीकडे लक्ष देणे आवश्यक आहे’, असे ताकसांडे म्हणाले. शेवटी कुटुंबियांनीच प्रयत्न करून इंजेक्शन मिळवल्याने रुग्णाला दिलासा मिळाला आहे.