नागपूर येथील स्वतःचा ऑक्सिजन बेड अन्य रुग्णाला देणारे संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकर (वय ८५ वर्षे) यांचे निधन !

  • बेड दिल्यावर ३ दिवसांनी निधन

  • वृद्ध संघ स्वयंसेवकाकडून परोपकाराचे महत्त्व अधोरेखित

कोरोनाच्या संकटकाळात अनेकांनी औषधे आणि खाट उपलब्ध करून देतांना, तसेच रुग्णाचे निधन झाल्यानंतरही रुग्ण, नातेवाईक यांची लुबाडणूक करून मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे प्रकार केले आहेत. असे स्वार्थी लोक असलेल्या समाजात स्वतःचा मृत्यू डोळ्यांसमोर दिसत असतांनाही इतरांना साहाय्य करणारे नारायण दाभाडकर ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नारायण दाभाडकर यांनी स्वतःच्या कृतीतून एकप्रकारे दातृत्वाचा आदर्शच घालून दिला आहे. कोरोनाच्या संकटकाळी समाजातील लोकांनी दाभाडकर यांच्या शिकवणीतून योग्य तो बोध घेऊन आचरण करावे, ही अपेक्षा !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायण दाभाडकर

नागपूर – शहरात कोरोनाच्या संसर्गामुळे ऑक्सिजन, औषधे आणि रुग्णालयात जागाही मिळत नाही. अशा परिस्थितीत येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायण दाभाडकर (वय ८५ वर्षे) यांनी रुग्णालयातील स्वतःचा ऑक्सिजनचा बेड नाकारून तो एका तरुणाला दिला. त्यानंतर अवघ्या ३ दिवसांनी दाभाडकर यांचे निधन झाले.

१. भाजप युवा मोर्चाच्या नागपूर शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे यांनी या संदर्भात सांगितले की, नारायण दाभाडकर हे लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक होते. गेल्या काही वर्षांपासून ते त्यांची मुलगी आसावरी कोठीवान यांच्याकडे वास्तव्याला होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. वय अधिक असल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांची ऑक्सिजन मात्रा ६० पर्यंत खाली गेली. त्यामुळे त्यांच्या जावयांनी त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती केलेे. पुष्कळ प्रयत्नानंतर दाभाडकर यांच्यासाठी एका बेडची व्यवस्था झाली.

२. त्याच वेळी एक महिला ४० वर्षीय कोरोनाबाधित पतीला घेऊन तेथे पोचली. रुग्णालयात जागा नसल्यामुळे महिलेला रडू कोसळले. त्या महिलेची अवस्था पाहून नारायण दाभाडकर यांनी स्वतःचा बेड त्या महिलेच्या पतीला देण्यासाठी रिकामा करत असल्याचे रुग्णालयाला लिहून दिले. या वेळी दाभाडकर यांच्या कुटुंबियांनी त्यांना असे करण्यास विरोधही केला.

३. या वेळी दाभाडकर म्हणाले, ‘‘माझे वय ८५ वर्षे असून मी भरपूर जगून घेतले आहे. या महिलेचा पती तरुण असून त्याच्यावर कुटुंबाचे दायित्व आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करून घ्यावे.’’ स्वतःची प्रकृती खालावत असूनही दुसर्‍यासाठी रुग्णालयात बेड रिकामा करून दाभाडकर घरी परतले; परंतु ३ दिवसांनी त्यांचे निधन झाले.