ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स यांच्याकडून भारताला ३७ लाख रुपयांचे साहाय्य !

‘आयपीएल्’च्या माध्यमातून, तसेच एरव्हीही शेकडो कोटी रुपये कमावणार्‍या भारतीय क्रिकेट खेळांडूंनी असे साहाय्य घोषित केल्याचे ऐकिवात नाही. भारतियांनी दिलेले प्रेम आणि पाठिंबा यांमुळे नावलौकिक प्राप्त झालेल्या भारतीय खेळाडूंची अशी उदासीन अन् संकुचित वृत्ती निषेधार्हच !

नवी देहली – सध्या भारतात हाहा:कार माजवणार्‍या कोरोना महामारीने जगाचे लक्ष वेधले आहे. ऑस्ट्रेलियाचे जगप्रसिद्ध क्रिकेट खेळाडू पॅट कमिन्स यांनी या महामारीशी सामना करण्यासाठी ५० सहस्र डॉलर्स म्हणजे ३७ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. ‘पंतप्रधान साहाय्य निधी’ (पी.एम्. केअर्स फंड) मध्ये ही रक्कम दान केल्याचे त्यांनी २६ एप्रिल या दिवशी घोषित केले. त्यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले, ‘‘मी भारत आणि भारतीय यांच्यावर पुष्कळ प्रेम करतो. येथील लोक अत्यंत उदार आणि आतिथ्यशील आहेत. भारतावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या स्थितीने मी व्यथित झालो आहे. भारतीय रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा, यासाठी मी ५० सहस्र डॉलर्स साहाय्य करत आहे. भारतियांचा स्नेह अनुभवलेल्या ‘आय.पी.एल्.’मधील, तसेच जगभरातील सर्व खेळाडूंना मी आवाहन करतो की, त्यांनीसुद्धा पुढे येऊन साहाय्य करावे.’’