१८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांमध्येच होणार ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

मुंबई – १ मे पासून चालू होणार्‍या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केवळ खासगी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांमध्येच होणार आहे. लसीकरणासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.  याविषयी महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांच्या अधिकार्‍यांना ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करतांना इक्बालसिंह चहल म्हणाले, ‘‘महानगरपालिका आणि शासन यांच्या एकूण ६३ केंद्रांवर ४५ वर्षे वयावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. मुंबईत १८ ते ४५ वर्षे वयोगटातील अनुमाने ९० लाख नागरिक आहेत. या सर्वांसाठी दोन डोस याप्रमाणे १ कोटी ८० लाख डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे या मोहिमेची व्यापकता पहाता लस साठ्याची पुरेशी उपलब्धता, खरेदी, वाहतूक, वितरण यांसमवेत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणे ही सर्व कळीची सूत्रे आहेत. याविषयी पालिकेकडून शासन आणि लस उत्पादक आस्थापने यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे. लसीकरणाची वाढती व्याप्ती पहाता नागरिकांची गर्दी आणि असुविधा होऊ नये, तसेच संपूर्ण लसीकरण मोहिमेचे व्यवस्थापन योग्यरित्या व्हावे, यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईत सध्या १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. यामध्ये शासकीय आणि महानगरपालिका यांची ६३ केंद्रे आहेत, तर खासगी रुग्णालयातील केंद्रांची संख्या ९९ झाली आहे. मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये प्रत्येकी एक केंद्र चालू करण्यासाठी संबंधित साहाय्यक आयुक्तांनी कार्यवाही चालू करावी. मुंबईतील गृहनिर्माण संस्था, ‘कॉर्पोरेट हाऊस’, विविध आस्थापने यांनी खासगी रुग्णालयांसमवेत समन्वय करून आपल्या सदस्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा.’’