गोव्यात दिवसभरात ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर २ सहस्र ११० नवीन रुग्ण

पणजी – गोव्यात २७ एप्रिलला दिवसभरात ३१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूंची संख्या १ सहस्र ८६ झाली आहे. यात ३५ ते ५० वर्षांपर्यंतच्या ७ रुग्णांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दिवसभरात कोरोनाबाधित २ सहस्र ११० नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यात दिवसभरात कोरोनाविषयक ५ सहस्र ५४८ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण पुन्हा वाढून ३८.०३ टक्के झाले आहे. २६ एप्रिलला कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी ३९ टक्क्यांवरून घटून ती ३४ टक्क्यांवर आली होती, ती आज पुन्हा वाढली.

शेजारील राज्यांतील दळणवळण बंदीचा गोव्यात जीवनावश्यक साहित्य मिळण्यावर परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री

पणजी – सरकारने परराज्यांतील वाहनांना गोव्यात प्रवेश करण्यास रोखलेले नसल्याने शेजारील राज्यांनी त्यांच्या राज्यांत दळणवळण बंदी घोषित केली असली, तरी गोव्यात जीवनावश्यक साहित्य मिळण्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी दिले आहे. याविषयी मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी सध्या चर्चा केली आहे, असे ते पुढे म्हणाले. या वेळी त्यांनी गोव्यातील अर्थव्यवस्थेशी निगडित सर्व गोष्टी चालू रहातील, असे सांगतांना ठिकठिकाणी भरणारे आठवड्याचे बाजार नेहमीपेक्षा मोठ्या जागेत भरवायला हवेत, असे मत व्यक्त केले.