जालना – केंद्र सरकारने हात आखडता हात घेतल्यामुळे राज्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. दैनंदिन ८ लाख डोसची आवश्यकता असतांना केवळ ५० सहस्र डोस मिळाले आहेत. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मुबलक लसींचा पुरवठा करायला हवा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केली.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली असून यात वित्त वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव आहेत. या समितीने एक आराखडा सिद्ध करून तो मंत्रीमंडळासह मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्रालय यांच्याकडे सादर करायचा आहे. केंद्र सरकारसमवेत सीरमचा येत्या २० मेपर्यंत करार आहे. यामुळे राज्याला लगेच लस मिळेल, असे दिसत नाही. १ मेपासून १८ ते ४४ वयाच्या लोकांचे लसीकरण चालू करायचे म्हटले, तरी लसींची उपलब्धता आणि किफायतशीर दर ही २ मोठी आव्हाने आहेत. भारत बायोटेक आस्थापनासह लसींच्या आयातीविषयीही चर्चा चालू आहे.