श्री हनुमान चालिसाचे पठण करणे, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणे; पण स्तोत्रपठणाच्या तुलनेत नामजपाचा परिणाम अधिक होणेे

स्तोत्र आणि नामजप यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

२७ एप्रिल २०२१ या दिवशी हनुमानजयंती आहे. यानिमित्ताने…

‘समाजातील बहुतांश व्यक्तींना वाईट शक्तींचा त्रास असतो. काही वेळा वाईट शक्तींमुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक त्रास होतात, तसेच जीवनात इतरही अडचणी येतात. वाईट शक्तींचे निवारण करणार्‍या देवतांपैकी एक म्हणजे मारुति. सगळ्या देवतांमध्ये केवळ मारुतीला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. म्हणूनच मारुतीला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कुणाला पछाडले, तर त्या व्यक्तीला मारुतीच्या मंदिरात नेतात किंवा मारुतिस्तोत्र, हनुमानचालिसा म्हणतात. मारुतीच्या (हनुमानाच्या) नामजपाने वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होते.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘मारुति’)

श्री हनुमान चालिसाचे पठण करणे आणि हनुमानाचा नामजप करणे, यांचा ते करणार्‍यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

सौ. मधुरा कर्वे

या चाचणीअंतर्गत एकूण ३ प्रयोग करण्यात आले. पहिल्या प्रयोगात तीव्र आध्यात्मिक त्रास असणारी साधिका आणि आध्यात्मिक त्रास नसणारा साधक यांनी श्री हनुमान चालिसाचे पठण करण्यापूर्वी आणि पठण केल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी दोन्ही साधकांना प्रत्येकी १५ मिनिटे लागली.

दुसर्‍या प्रयोगात दोन्ही साधकांनी हनुमानाचा ‘श्री हनुमते नम: ।’ हा तारक नामजप १५ मिनिटे केला. साधकांनी तो नामजप करण्यापूर्वी आणि नामजप केल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

तिसर्‍या प्रयोगात दोन्ही साधकांनी हनुमानाचा ‘ॐ हं हनुमते नम: ।’ हा मारक नामजप १५ मिनिटे केला. साधकांनी तो नामजप करण्यापूर्वी आणि नामजप केल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.

या सर्व निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – चाचणीतील तिन्ही प्रयोगांचा साधकांवर झालेला परिणाम

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने श्री हनुमान चालिसाचे पठण केल्यानंतर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा न्यून झाली; तर हनुमानाचा तारक आणि मारक नामजप केल्यानंतर तिच्यातील ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.

२. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने श्री हनुमान चालिसाचे पठण, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप केल्यानंतर तिच्यातील ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली.

३.तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेने श्री हनुमान चालिसाचे पठण, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप केल्यानंतर तिच्यामध्ये उत्तरोत्तर अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.

४. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाने श्री हनुमान चालिसाचे पठण, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप केल्यानंतर त्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. श्री हनुमान चालिसा : ‘श्री हनुमान चालीसा या स्तोत्राची रचना संत गोस्वामी तुलसीदास यांनी १६ व्या शतकात केली. श्री हनुमान चालीसा हे अवधी भाषेत आहे. हे स्तोत्र ४० श्‍लोकांचे आहे, म्हणून त्याला चालीसा असे म्हणतात.’ (संदर्भ : https://mr.wikipedia.org/wiki/हनुमान चालीसा) ‘स्तूयते अनेन इति’ म्हणजे ज्यायोगे देवतेचे स्तवन केले जाते ते स्तोत्र, अशी स्तोत्र या शब्दाची व्याख्या आहे. स्तोत्रात देवतेच्या स्तुतीबरोबरच स्तोत्रपठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्तीही असते. स्तोत्रांमध्ये दिलेल्या फलश्रुतीमागे रचयित्याचा संकल्प असल्याने ते पठण करणार्‍याला फलश्रुतीमुळे फळ मिळते.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘श्रीरामरक्षास्तोत्र’)

२ आ. हनुमानाचा नामजप : ‘मारुतीमधील प्रकट शक्ती (७२ टक्के) इतर देवांच्या (१० टक्के) तुलनेत अतिशय जास्त असल्याने वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ, तसेच रोगनिवारणार्थ मारुतीची उपासना करतात. मारुतीच्या (हनुमानाच्या) नामजपाने वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण होते.’ (संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ – ‘मारुति’)

चाचणीतील दोन्ही साधकांना श्री हनुमान चालिसाचे पठण, तसेच हनुमानाचा तारक आणि मारक नामजप केल्यावर आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले. ते पुढे दिले आहेत.

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेली साधिका : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या भोवती वाईट शक्तींच्या त्रासामुळे त्रासदायक शक्तीचे आवरणही होते. शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवली जाते आणि शरिराभोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण ‘इन्फ्रारेड’ या नकारात्मक ऊर्जेने दर्शवले जाते. श्री हनुमान चालिसाचे पठण, तसेच श्री हनुमानाचा नामजप केल्यानंतर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेच्या शरिरातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील नकारात्मक ऊर्जा (‘अल्ट्राव्हायोलेट’ ऊर्जा) आणि साधिकेभोवतीची नकारात्मक ऊर्जा (‘इन्फ्रारेड’ ऊर्जा) या पुष्कळ प्रमाणात न्यून झाल्या किंवा नाहीशा झाल्या, तसेच तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे, हेही विशेष आहे.

२. आध्यात्मिक त्रास नसलेला साधक : आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाभोवती नकारात्मक ऊर्जा नव्हती. श्री हनुमान चालिसाचे पठण, तसेच हनुमानाचा नामजप केल्यानंतर त्याच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत वाढ झाली.

हा सर्व परिणाम श्री हनुमानचालिसाचे पठण, तसेच श्री हनुमानाचा नामजप यांतील सकारात्मक ऊर्जेमुळे झाला. सकारात्मक ऊर्जेमुळे एखाद्याभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे सोपे आहे; पण एखाद्यातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती दूर होण्यासाठी पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आवश्यक असते. श्री हनुमान चालिसाच्या केवळ १५ मिनिटांच्या पठणाने, तसेच हनुमानाच्या केवळ १५ मिनिटांच्या नामजपाने हे दोन्ही साध्य झाले.

येथे विशेष लक्षात घेण्याचे सूत्र म्हणजे चाचणीतील दोन्ही साधकांवर श्री हनुमान चालिसापेक्षा हनुमानाच्या नामजपाचा परिणाम अधिक प्रमाणात झाला. त्यातही हनुमानाच्या तारक स्वरूपाच्या नामजपापेक्षा मारक स्वरूपाच्या नामजपाचा परिणाम सर्वाधिक झाला. याचे कारण ‘हनुमानाच्या तारक स्वरूपाच्या नामजपापेक्षा मारक स्वरूपाच्या नामजपामध्ये अधिक शक्ती असते’, हे आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.४.२०१९)

ई-मेल : [email protected]

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : आध्यात्मिक त्रास असणे, म्हणजे व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक