अमेरिकेचा दुटप्पीपणा !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने भारताला कोरोनाची लस बनवण्यासाठी आवश्यक तो कच्चा माल देण्यास नकार दिला आहे. ‘अमेरिकी नागरिकांना आम्ही प्रथम प्राधान्य देणार आहोत’, असे सांगीतले. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी दबाव आणल्यावर अमेरिकेने साहाय्य करण्याचे मान्य केले; मात्र यातून बरेच प्रश्‍न निर्माण झाले. स्वत:च्या नागरिकांचा विचार करणे हे आवश्यक आहे आणि एखाद्या देशाचा राष्ट्रप्रमुख तसेच करेल; मात्र आज जग कोरोना महामारीने ग्रासले असतांना आणि एकमेकांना साहाय्याची आवश्यकता असतांना महासत्ता म्हणवून घेणार्‍या ‘अमेरिकेचे हे वागणे योग्य आहे का ?’ याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

धमकावणारी अमेरिका !

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी भारतात उत्पादित होणार्‍या ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’ची मागणी जगात कोरोनाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. भारताची लोकसंख्या सव्वाशे कोटींहून अधिक आहे. ‘या औषधाचा गुण कोरोनाच्या रुग्णांना लागू पडत आहे’, असे लक्षात आल्यावर भारताने त्याची निर्यात बंद केली. त्याचा उद्देश भारतात कोरोना फोफावल्यामुळे रुग्णांना ते देऊन त्यांचे प्राण वाचावेत हा होता. भारताने निर्यात बंद केल्यावर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले आणि त्यांनी ‘भारताने बंदी उठवली नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील’, अशी धमकी दिली. अन्य देशांमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढल्यावर भारताने मानवतेच्या दृष्टीने विचार करून केवळ अमेरिकाच नव्हे तर अन्य देशांनाही साहाय्य केले. ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन’चे भारतात उत्पादन करून प्रथम भारतियांना वितरित करायचे झाल्यास अन्य देशांपर्यंत ते पोचणार नाही, अशी परिस्थिती होती. तरीही भारताने उदारतेचे दर्शन जगाला घडवत केवळ शेजारीच नव्हे, तर अन्य अनेक देशांना या औषधाचा पुरवठा केला. कठीण काळात मिळालेल्या भारताच्या या साहाय्याविषयी अनेक देशांनी आभार मानले. या औषधाच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल ब्राझिलने देऊन भारतालाही साहाय्य केले होते.

भारताची उदारता

त्यानंतर भारतात सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड आणि भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन या कोरोना आजारावर औषध म्हणून २ लसींची निर्मिती झाली. भारतात या लसींचे उत्पादन जेमतेम चालू झाल्यावर भारतातील काही राज्यांना या लसींचा पुरवठा करून अन्य देशांना या लसी विनामूल्य, तर काहींना मागणीनुसार अल्प मूल्यात पाठवण्यास आरंभ केला. तेव्हाही जगातील अनेक देशांनी भारताचे आभार मानले. मध्य पूर्वेतील एका देशाच्या प्रमुखाने ‘भारताची लोकसंख्या अधिक असूनही, भारताने त्याच्या सर्व नागरिकांना लस देण्याऐवजी शेजारील देशांचा विचार केला आहे. भारताची ही कृती निश्‍चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे’, असे सांगितले होते. अनेक देशांनी भारताचे ‘जगाचे औषधालय’ असे वर्णन करून भारताला मानाचा मुजरा केला होता. अमेरिकेतील बिल गेट्स यांसारख्या अब्जाधिशांनी ‘भारत जगाला नियोजनबद्धरित्या करत असलेला औषधांच्या पुरवठ्यामुळे भारताचे अनुकरण अन्य देशांनी केले पाहिजे. भारताकडून बरेच शिकण्यासारखे आहे’, असे सांगितले.

भारताने अमेरिकेप्रमाणे अशी भूमिका घेतली असती, तर मात्र भारतावर चहुबाजूंनी टीका झाली असती. शेवटी भारतीय आणि अमेरिकी किंवा पाश्‍चात्त्य संस्कृतीमधील भेद यातून ठळकपणे दिसून आला. स्वत:पेक्षा आधी इतरांचा विचार करायला हिंदु संस्कृती शिकवते. इतरांच्या साहाय्याला धावून जाण्याची हिंदूंची प्राचीन परंपराच आहे. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्ता असणार्‍या देशाची मूल्ये किती पोकळ आणि स्वार्थी आहेत, हेच दिसून येते. या घटनेवरून अमेरिका भारताचा मित्र असूच शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे भारतीय शासनकर्त्यांनी यातून बोध घेऊन ‘तिच्याशी कसे संबंध ठेवायला हवेत ?’ याचा विचार करावा, ही अपेक्षा !