महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि ‘रेमडेसिविर’ यांचा आवश्यक तो पुरवठा व्हावा ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई – महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची आवश्यकता आहे, तसेच ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा पुरेसा पुरवठा आवश्यक आहे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. २३ एप्रिल या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अधिक संसर्ग असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

या वेळी पंतप्रधानांना आवाहन करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास विमानाने रिकामे टँकर्स पाठवून ऑक्सिजन अन्य ठिकाणांहून मिळावा. ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने तेथील संसर्ग थोपवता आला. आपल्याकडे लसउत्पादक आस्थापनांची मर्यादित क्षमता पहाता अन्य देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आयात करून लसीकरणाची गती वाढवावी का ?, याविषयी मार्गदर्शन करावे. ‘रेमडेसिविर’ किती उपयुक्त आहे ? ते सांगता येत नाही; पण रुग्णांचा रुग्णालयातील कालावधी निश्‍चितपणे अल्प करत आहे. त्या दृष्टीने राज्याला रुग्णसंख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा.’’