स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहकार्य करा ! – नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील

सातारा – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ब्रेक द चेनची नियमावली जाहीर करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी आर्थिक सहकार्याची घोषणा केली; मात्र कष्टकरी माथाडी कामगारांविषयी त्यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. दळणवळण बंदीच्या काळात गतवर्षी आणि आतासुद्धा जीव धोक्यात घालून राबणार्‍या या घटकांविषयी मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांना आर्थिक सहकार्य द्यावे, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

अनुमाने २५ माथाडी कामगारांचा कोरोनाने बळी घेतला;मात्र अजूनही त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहकार्य देण्याविषयी शासनाचा काहीही निर्णय झालेला नाही. आता पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेनची घोषणा केली आहे. त्यामध्ये अनेक घटकांना त्यांनी दिलासा देणारी भूमिका जाहीर केलेली असली, तरी माथाडी कामगारांसाठी मात्र निर्णय घेतलेला नाही. माथाडी कामगार हासुद्धा कष्टकरी घटक आहे.कारखान्यातील कामगारांप्रमाणे माथाडी कामगारांविषयीही योग्य निर्णय घेऊन कार्यवाही करावी.