कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
धायटी (जिल्हा सातारा) येथील कोरोनाबाधितांची पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर गर्दी
सातारा, २० एप्रिल (वार्ता.) – पाटण तालुक्यातील धायटीमध्ये आतापर्यंत २० नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांना घरीच विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे, तरी बाधितांमधील महिला आणि पुरुष मंडळी सार्वजनिक नळांवर पाणी भरण्यासाठी येत असल्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत करण्याचे प्रशासनासमोर खडतर आव्हान उभे आहे.
धायटीमध्ये १५ एप्रिल या दिवशी ११ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. नंतर १७ एप्रिल या दिवशी त्यात अजून ९ कोरोनाबाधितांची भर पडली. बाधितांना पाटण येथील कोरोना कक्षामध्ये भरती करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न केले; मात्र बाधितांना जाण्यास नकार दिल्याने त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करून उपचार चालू करण्यात आले. बाधितांवर कुणाचेच लक्ष नसल्यामुळे ही मंडळी चक्क सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी येत आहेत. काही जण तर शेतात जाऊन आपली दैनंदिन कामे करत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी कशी तोडायची ? हा गंभीर प्रश्न प्रशासनापुढे उभा आहे.
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी प्रयत्न करत असले, तरी त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिर, अंगणवाडी शाळा या ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करून बाधितांची सोय केली पाहिजे, म्हणजे बाधितांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर एकाच ठिकाणी उपचार करणे सोयीचे होईल. यासाठी ग्रामपंचायत आणि कोरोना दक्षता समिती यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. – संपादक
रुग्णाला कोरोना चाचणी करण्यास न सांगणार्या सोलापूर येथील २ खासगी डॉक्टरांवर गुन्हा नोंद !
सोलापूर – कोरोना चाचणी करण्यासाठी रुग्णाला सूचना केली नाही, तसेच उपचाराची माहिती महापालिका आरोग्य केंद्रात कळवली नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत येथील २ खासगी डॉक्टरांविरुद्ध महापालिका आरोग्य विभागाने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार विजापूर नाका आणि जेल रोड पोलीस ठाणे येथे संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१. येथील निर्मल क्लिनिकचे डॉ. युवराज माने यांच्याकडे १२ एप्रिल या दिवशी एका ८४ वर्षीय रुग्णाने उपचार घेतले; मात्र डॉ. युवराज माने यांनी रुग्णाची माहिती महापालिका नागरी आरोग्य केंद्रास दिली नाही. त्यानंतर ती व्यक्ती १४ एप्रिल या दिवशी ‘ई.एस्.आय.’ रुग्णालय येथे कोविड वार्डात भरती झाली होती, त्यांचे त्याच दिवशी निधन झाले. त्या वेळी त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आला होता.
२. अक्कलकोट रस्त्यावरील डॉ. जी.बी. विश्वासे यांचे नित्यानंद रुग्णालय आहे. येथे महापालिकेच्या आरोग्य विभागाने भेट दिली असता रुग्णालयातील नोंदवहीमधील नोंदी अनियमित आढळल्या.
कळंब (धाराशिव) येथे नगरपालिका कर्मचारी न आल्याने मृतदेह ३ घंटे शववाहिकेत !
कळंब (धाराशिव) – शहरातील एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी न आल्याने मृतदेह ३ घंटे शववाहिकेतच ठेवण्यात आला. अखेर आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी मुख्याधिकार्यांना धारेवर धरल्यानंतर पालिका यंत्रणेने त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. येथील एक ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण घरी अलगीकरणामध्ये उपचार घेत होता. या रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
दायित्वशून्य नागरिक !
कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर शासनाने विविध उपाययोजनांसह निर्बंध घातले आहेत. यामध्ये १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी घोषित केली आहे. याविषयी जनजागृती करूनही लोकांकडून आवश्यक ते निर्बंध पाळले जात नाहीत, असे लक्षात आले. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्तासह आता अनावश्यक फिरणार्यांची ‘रॅपिड टेस्ट’ घेण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या २ दिवसांत अशी टेस्ट केली असता काही जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. यावरून प्रशासनाने ‘रॅपिड टेस्ट’चा निर्णय घेतला नसता, तर कोरोनाचा संसर्ग झालेले लक्षात न आल्याने अशा व्यक्तींकडून कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर इतरांना संसर्ग होत राहिला असता, असे लक्षात येते.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |