पणजी, १७ एप्रिल (वार्ता.) – राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ‘ऑक्सीजन सिलिंडर’ राज्याबाहेर निर्यात करण्यास शासनाने बंदी घातली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘औद्यागिक क्षेत्रात होत असलेला ‘ऑक्सीजन सिलिंडर’चा पुरवठा आरोग्य सेवेसाठी वापरला जाणार आहे. आरोग्य खात्याचे सचिव याविषयी संबंधित जिल्हाधिकार्यांकडे समन्वय साधत आहेत. ‘आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५’ अंतर्गत लोकांचा जीव वाचावा म्हणून शासनाने हे पाऊल उचलले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ज्यांना लस घेण्याची अनुमती आहे, त्यांनी त्वरित लस घ्यावी, असे मी आवाहन करतो.’’
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने सामाजिक माध्यमातील खोट्या वृत्ताला दिले योग्य प्रत्युत्तर
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात महाविद्यालयाच्या बाहेर रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती सामाजिक माध्यमांत प्रसारित होत आहे. हे वृत्त खोटे असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले असून यासाठी रुग्णालयाच्या ‘कॅज्युअल्टी ब्लॉक’च्या बाहेरील, तसेच पार्किंग विभागाच्या बाहेरील जागेची छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित केली आहे. या छायाचित्रांमध्ये कुठेही रुग्णांवर उपचार होत असतांना दिसत नाही. समाजात भीती निर्माण करणारी ‘पोस्ट’ प्रसारित करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.