खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचारांची देयके तपासणीसाठीची समिती कार्यान्वित

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील खासगी रुग्णालये ‘पेड कोविड हॉस्पिटल’ (रुग्णांना उपचाराचा व्यय करावा लागणारी रुग्णालये) म्हणून चालवण्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी अनुमती दिलेली आहे. या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दरांपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रुग्णालयांकडून कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांकडून उपचारापोटी आकारण्यात येणार्‍या देयकांची तपासणी आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत करण्यात येणारे उपचार अन् योजनेचा लाभ आदींची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरावर समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. (प्रत्येक सूत्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी समिती स्थापन करावी लागत असेल, तर प्रामाणिकपणा, नैतिकता आदी माणुसकीच्या प्राथमिक सूत्रांचा समाजात किती अभाव आहे, हेच लक्षात येते ! – संपादक)

तालुकास्तरावर निवासी नायब तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि पंचायत समितीचे साहाय्यक लेखाधिकारी हे अधिकारी खासगी रुग्णालय व्यवस्थापनाशी संबंधित समन्वय अधिकारी म्हणून काम पहातील. देयक तपासणी अधिकारी रुग्णालयाने दिलेल्या देयकाची तपासणी करून देयक देण्याविषयी शिफारस देतील. तसेच देयक हे विहीत दराप्रमाणे असल्याविषयी तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी शिफारस द्यावयाची आहे, तर रुग्णालय व्यवस्थापनाने दिलेल्या देयकावर संबंधित रुग्णाचा आक्षेप असल्यास त्याविषयी जिल्हास्तरीय समितीने चौकशी करून आपला निर्णय कळवायचा आहे. अशा प्रकारे जिल्हास्तरावरही समिती स्थापन करण्यात आली आहे.