चैत्र मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

साप्ताहिक शास्त्रार्थ

‘१३.४.२०२१ या दिवसापासून चैत्र मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. १८.४.२०२१ ते २४.४.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.

सौ. प्राजक्ता जोशी

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन संवत् शक – १९४३, उत्तरायण, वसंतऋतू, चैत्र मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

२. शास्त्रार्थ

२ अ. श्रीरामानुजाचार्य जयंती : रविवार, १८.४.२०२१ या दिवशी श्रीरामानुजाचार्य जयंती आहे. श्रीरामानुजाचार्य यांनी देशभर भक्तीचा प्रचार केला. ‘कर्म आणि भक्ती यांनी चित्त शुद्ध होते. भक्ती योगानेच मोक्षाधिकार प्राप्त होतो’, असा सिद्धांत त्यांनी स्थापन केला.

२ आ. कार्तिकस्वामींना दवणा वाहणे : चैत्र शुक्ल पक्ष षष्ठी या दिवशी कार्तिकस्वामींना दवणा वाहतात.

२ इ. पद्मकयोग : रविवारी षष्ठी आणि सप्तमी तिथी एकत्र येते. तेव्हा ‘पद्मकयोग’ होतो. हा शुभ योग आहे. रविवार, १८.४.२०२१ या दिवशी षष्ठी आणि सप्तमी तिथी आहे.

२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १७.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.३३ पासून १८.४.२०२१ या दिवशी रात्री १०.३५ पर्यंत आणि २३.४.२०२१ या दिवशी रात्री ९.४८ पासून २४.४.२०२१ या दिवशी पहाटे ६.२२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ उ. सूर्याला दवणा वाहणे : चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी या तिथीला सूर्याला दवणा वाहतात.

२ ऊ. अशोक कलिका प्राशन : चैत्र शुक्ल अष्टमी आणि पुनर्वसु नक्षत्र असा एकत्रित योग असतांना अशोक कलिका प्राशन करतात.

२ ए. वृषभायन : १९.४.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.०३ मि. नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्‍चात्त्य पद्धतीनुसार) वृषभ राशीत प्रवेश करत आहे.

२ ऐ. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. २०.४.२०२१ या दिवशी रात्री १२.४४ पर्यंत दुर्गाष्टमी आहे. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. दुर्गासप्तशतीस्तोत्र, देवीकवच, अर्गलास्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात.

२ ओ. श्री भवानीदेवी उत्पत्ती : चैत्र शुक्ल नवमी युक्त अष्टमीच्या दिवशी श्री भवानीदेवीचे पूजन करतात. हा श्री भवानीदेवीचा उत्पत्ती दिन मानला जातो.

२ ओ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १९.४.२०२१ या दिवशी रात्री १२.०२ पासून २०.४.२०२० दुपारी १२.२९ पर्यंत आणि २३.४.२०२१ या दिवशी सकाळी १०.४८ पासून रात्री ९.४८ पर्यंत विष्टी करण आहे.

२ औ. श्रीरामनवमी : चैत्र शुक्ल नवमी या तिथीला प्रभु श्रीराम यांची जयंती केली जाते. यासाठी नवमी मध्यान्ह व्यापिनी हवी.

२ अं. देवी नवरात्र समाप्ती, देवीला दवणा वाहणे : चैत्र शुक्ल नवमी या तिथीला देवी नवरात्र पूर्ण होते. या तिथीला देवीला दवणा वाहतात.

२ क. कामदा एकादशी : चैत्र शुक्ल पक्ष एकादशीला ‘कामदा एकादशी’ म्हणतात. २३.४.२०२१ या दिवशी कामदा एकादशी आहे. या एकादशीच्या व्रताने अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे या एकादशीला ‘फलदा एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी श्रीकृष्ण दोलोत्सव साजरा करतात.

२ ख. शनिप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. शनिवारी येणार्‍या त्रयोदशी तिथीला ‘शनिप्रदोष’ म्हणतात. २४.४.२०२१ या दिवशी शनिप्रदोष आहे. संतती सुख आणि जीवनात येणार्‍या अडचणींच्या निवारणार्थ शनिप्रदोष हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच आणि शिवमहिम्न स्तोत्र वाचावे.

टीप १ : भद्रा (विष्टी करण), दुर्गाष्टमी, एकादशी, घबाड मुहूर्त, यमघंट आणि प्रदोष यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.४.२०२१)