१. खरे संत कसे असतात ?
१ अ. खरा बुवा (संत) कुणाला म्हणावे ? : ‘बाई पहाताच ज्याची चल-बिचल होत नाही. जो कामवासनेला किंमत देत नाही आणि स्थिर आहे, तो खरा बुवा (संत) आहे. बाकी खोट्या बुवांनी जग भरलेलेच आहे. गुरु तपासून करावा. भक्ती, ज्ञान, वैराग्य, आरोग्य आणि शक्ती प्राप्त झालेला गुरु करावा. नाहीतर ‘आडात नसेल, तर पोहर्यात कुठून येणार ?’, अशी स्थिती होईल.’
१ आ. जितेंद्रिय : ‘ईश्वरासाठी लौकिक भोग सोडतो, तो ईश्वराच्या सदा आनंदात रहातो; कारण त्याला मृत्यूलोकाचे काहीही नको असते. तो जितेंद्रिय झालेला असतो.’
१ इ. खरे वैराग्य असलेले खरे संत : ‘जिवाला खरे वैराग्य आले आहे का ? तो सर्व लौकिक विकारांतून बाहेर पडला आहे का ? सर्व नाती गोती सोडून एका भगवंताशी एकरूप झाला आहे का ? नुसते ‘सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ३८) म्हणजे ‘सुख-दुःख, लाभ-हानी, यश-अपयश यांचा विचार करू नकोस’, असे म्हणणे सोपे आहे; परंतु ज्या वेळी घरात प्रेत येते किंवा संकट येते, त्या दिवशी साधूसंतांची खरी परीक्षा होते. कितीही मोठे दुःख आले, तरी जो डगमगत नाही, डोळ्यांतून अश्रू काढत नाही, तो खरा संत. हे सर्व जन्म-मृत्यूचे नाटक अनादि काळापासून चालत आले आहे. संतांनी या खेळात भिजून जाऊ नये.’
१ ई. ज्यांनी आपले वाईट केले, त्यांचेही भलेच करतात, तेच खरे संत असणे : ज्यांनी आपले वाईट केले, त्यांचे आपण चांगले करावे. ज्यांनी आपल्या वाटेत काटे टाकले, त्यांच्या वाटेत आपण फुले उधळावीत ! हीच ‘खरे संत’ असण्याची लक्षणे आहेत. ‘नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥’ (तुकाराम गाथा, अभंग १४७५, ओवी १) हे काम तेवढे सोपे नाही; कारण आपल्या शरिरात अहंकाराचा वारा खच्चून भरला आहे. आपले मन आपल्याला असे नम्र होऊ देणार नाही. धरती मातेला खोदतात, तिच्यावर थुंकतात, तरी ती आम्हाला क्षमा करून धान्य देते आणि जगवतेे. आंब्याचे झाड तोडणार्यालाही ते झाड गोड फळे देते. सूर्य-चंद्र यांच्याकडे पाहून लघुशंका केली, तरी ते आपल्याला उजेडच देतात. अशी संत लक्षणे हवीत.’
२. संत समाजाला करत असलेले साहाय्य
२ अ. साधू-संत समाजाचे पापे धुवून त्यांना सुखी करतात ! : ‘साधू-संत समाजाचे पाप धुतात, पाप खातात, स्वतः दुःखी रहातात आणि आपले सुख समाजाला देतात. आपले हालहाल करून घेतात. तेव्हाच तिथली भूमी पवित्र होते, भूमीपुत्र सुखी होतात आणि मग तिथे सुखाचा सुकाळ होतो.’
२ आ. संत समाजातील दुःखे दूर करतात ! : ‘कैदी सोडवायचा असेल, तर न्यायालयीन पात्रतेचा जामीन लागतो. पात्रतेचा जामीन दिल्यावरच कैदी सुटतो, तसेच जे देवाचे खरे पुण्यवंत भक्त असतात, त्यांची निवड देव समाजातील दुःखे दूर करण्यासाठी करतो. त्याने कुणाला खरूजकाटा झाला किंवा सर्प, विंचू चावला की, पुण्यवंताने हात लावताच विष पळून जाते आणि त्या प्रसंगात पडलेला माणूस चांगला होतो. आम्हाला जी पात्रता दिली आहे, ती भगवंत पांडुरंगाने; मात्र ज्याला आम्ही चांगला करतो, त्याच्यासाठी आमच्या गाठीला असलेले पुण्य देव न्यून करतो आणि मग त्याला चांगला करतो. पुण्य घेतल्याविना देवसुद्धा काहीही देत नाही.’
२ इ. समाजाला असलेली संतांची देणगी : ‘नवनाथ सगळीकडे फिरत असायचे. त्यांची ‘अलख निरंजन’ ही घोषणा म्हणजे आम्ही विकारी नाही. सर्वांपेक्षा अलग जीवन जगतो, असा अर्थ. समर्थ रामदास स्वामींची घोषणा ‘जय जय रघुवीर समर्थ ।’, संत ज्ञानेश्वरांचा मंत्र ‘रामकृष्ण हरि ।’, प.पू. गजानन महाराज यांचा ‘गण गण गणात बोते ।’, पतंजलि शास्त्र पंडित रामदेव त्यागी योग शिकवतात, अशी समाजाला संतांची देणगी आहे.’
– पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.(पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)