चाचण्याच करण्यात आल्या नाहीत, तर रुग्ण सापडणार कसे ? रुग्ण सापडले नाहीत, तर उपचार कसे होणार ? आणि उपचार झाले नाहीत, तर व्यक्ती दगावणार, हे पहाता सरकारने कठोर उपययोजना करणे आवश्यक !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी लॅबवरील ताण पहाता राज्यातील खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यास अनुमती देण्यात आली आहे; मात्र लक्ष्मणपुरी शहरातील अनेक लॅबमध्ये चाचणी बंद करण्यात आल्याचे चित्र दिसून आल्याचे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.
१. खासगी लॅबमध्ये चाचणी होत नसल्याने सरकारी रुग्णालयांसमोर चाचण्यांसाठी रांगा दिसून येत आहेत. कामाचा ताण वाढल्याने आरोग्य विभागाकडून घरातून नमुने गोळा करण्याचे अभियान बंद करण्यात आले आहे. यामुळे अनेक वयोवृद्ध व्यक्ती, आजारी आणि गर्भवती महिला यांना कोरोना चाचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच वेळेत चाचणी न झाल्याने आणि योग्य उपचार न मिळाल्याने अनेकांचे मृत्यू होत आहेत.
२. राज्यशासनाकडून आर्टी-पीसीआर् चाचणीसाठी ९०० रुपये निर्धारित केले आहेत. अनेक खासगी लॅबकडून हे शुल्क अल्प असल्याचे कारण सांगितले जात आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात लोक काम करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांना अधिक वेतन द्यावे लागत आहे.
३. शहरात किती खासगी लॅबमध्ये कोरोना चाचण्या चालू आहेत आणि किती नाहीत, याची सूची किंवा माहिती मुख्यमंत्री कार्यालयालाही देता आली नाही. ‘नवभारत टाइम्स’ने खासगी लॅबशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला; परंतु सर्वांकडून ‘आमच्याकडे कोरोना चाचणी बंद आहे’, असे उत्तर देण्यात आले.