आज्ञापालन आणि परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा व्हावी, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे अन् साधकांना साधनेत साहाय्य करणारे पुणे येथील साधक श्री. प्रदीप वाडकर !

चैत्र शुक्ल पक्ष पंचमी (१७.४.२०२१) या दिवशी पुणे येथील साधक श्री. प्रदीप वाडकर यांचा वाढदिवस आहे. ते सामाजिक प्रसारमाध्यमांच्या संबंधित वेगवेगळ्या सेवा करतात. त्यांच्यातील तळमळीमुळे ते प्रत्येक सेवेचे व्यवस्थित नियोजन करून सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. प्रदीप वाडकर

श्री. प्रदीप वाडकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. सायली जाधव, पुणे

१ अ. ‘साधक अल्प असल्यामुळे ‘ऑनलाईन’ सत्संग सेवेत अडचणी येतात’, हे लक्षात घेऊन नवीन साधक सिद्ध करण्यावर भर देणे आणि एक शिबिर घेऊन अनेक साधकांना सेवा शिकवणे

‘दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. आरंभी या सेवा करणारे साधक अल्प असल्याने आम्हाला पुष्कळ अडचणी यायच्या. तेव्हा ‘या अडचणींवर मात करण्यासाठी ही सेवा करणार्‍या साधकांची संख्या वाढवली पाहिजे, आणखी साधक सिद्ध केले पाहिजेत, तरच गुरुदेवांना अपेक्षित अशा सेवा होतील’, असे प्रदीपदादांनी आमच्या मनावर बिंबवले. जिल्ह्यात ठराविक साधकांनाच ‘कोरल ड्रॉ’ ही प्रणाली (‘इमेज पोस्ट’ बनवण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली) येत होती. प्रदीपदादांनी तळमळीने नवीन साधकांसाठी शिबिर घेऊन त्यांना ही प्रणाली शिकवली आणि त्यांच्याकडून सरावही करून घेतला. त्यामुळे आता नवीन साधक सिद्ध झाले असून ते या सर्व सत्संगांची सेवा संभाळत आहेत. आता अनेक साधकांना सेवेची संधीही मिळत आहे.

१ आ. साधकांना साधनेसाठी साहाय्य करणे

१ आ १. साधकांना अंतर्मुख करणे : आम्ही प्रदीपदादांना आमच्याकडून झालेली चूक सांगतो. तेव्हा ते ती शांतपणे ऐकून घेतात आणि ‘ती चूक का झाली ? त्या वेळी मनात काय विचार होते ? काय करायला हवे होते ?’, असे प्रश्‍न विचारतात. यातून ते साधकाला चुकीच्या मुळापर्यंत घेऊन जातात. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमुळे मन अंतर्मुख होऊन ‘आपण कुठे चुकलो ?’, याचे चिंतन होते.

१ आ २. स्वभावदोषांची जाणीव करून देणे : एकदा मी प्रदीपदादांना सेवेत येणार्‍या अडचणी सांगितल्या. तेव्हा त्यांनी मला ‘स्वतःच्या मनाचे चिंतन करा. उत्तरदायी साधकांनी सांगितलेले पालट मनापासून स्वीकारले का ? मनात काय विचार आले ?’, असे प्रश्‍न विचारले आणि मला माझ्या स्वभावदोषांची जाणीव करून दिली. यातून ‘सर्व मनापासून स्वीकारले की, अडचणी या अडचणी वाटतच नाहीत’, हे मला शिकायला मिळाले.

१ आ ३. साधनेचे दृष्टीकोन देऊन साधिकेच्या मनाची नकारात्मक स्थिती दूर करणे : एकदा मला एका सेवेचे नियोजन करायचे होते; पण काही कारणाने मला ती सेवा करता आली नाही. तेव्हा मला थोडे वाईट वाटले. तेव्हा प्रदीपदादा म्हणाले, ‘‘देवाला सर्व कळते. तो आपली तळमळ बघतो. आपल्याला आनंदाने सर्व परिस्थिती स्वीकारता आली की, आपली साधना झाली.’’ त्यांनी असा दृष्टीकोन दिल्याने माझ्या मनावरील ताण गेला आणि माझी नकारात्मक स्थिती पालटली.

१ इ. संत आणि साधक यांनी सांगितलेले पालट सकारात्मक राहून स्वीकारणारे अन् आज्ञापालन करण्याचा १०० टक्के प्रयत्न करणारे प्रदीपदादा !

प्रदीपदादांमध्ये असलेल्या अनेक गुणांतील महत्त्वाचा गुण म्हणजे ‘आज्ञापालन’ ! सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेली सूत्रे पूर्ण करण्यासाठी ते त्यांच्या परीने १०० टक्के प्रयत्न करतात. उत्तरदायी साधक आणि सहसाधक यांनी सुचवलेली सूत्रेही ते नेहमी सकारात्मक राहून स्वीकारतात अन् त्यानुसार प्रयत्न करतात. नुकत्याच झालेल्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या संदर्भात संतांनी काही पालट करायला सांगितले होते. त्या वेळी प्रदीपदादांनी पुष्कळ प्रयत्न करून ‘संतांना आवडेल’, अशी सेवा करण्याचा तळमळीने प्रयत्न केला.

१ ई. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा

प्रदीपदादांची परात्पर गुरु डॉक्टरांवर ठाम श्रद्धा आहे. कुठलीही कठीण परिस्थिती किंवा प्रसंग निर्माण झाला, तरी ‘गुरुदेव आहेत आणि तेच सर्व करवून घेणार आहेत’, असा त्यांचा भाव असतो.’

२. श्री. गणेश तांबे, रायगड

२ अ. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली, तरी स्थिर आणि सकारात्मक रहाणे

‘अनेकदा सेवा करतांना अकस्मात् झालेल्या काही पालटांमुळे ती सेवा वेळेत पूर्ण होण्यात अनेक अडचणी येतात; पण अशा परिस्थितीतही प्रदीपदादा नेहमी सकारात्मक असतात. त्यांच्या बोलण्यात कधीच ताण जाणवत नाही. इतर साधकांनाही ते त्या स्थितीतून बाहेर काढतात. ‘यातून गुरुदेवांना आपल्याला काही तरी शिकवायचे असेल’, असे त्यांना वाटते.

२ आ. साधकांच्या गुणांचा अभ्यास करून त्यांना सेवा देणे

प्रदीपदादा सेवेत नवीन असलेल्या साधकांना प्रोत्साहन देतात. ‘त्यांच्यात कुठले गुण आहेत ? त्यांना कुठली सेवा दिल्यावर समष्टीला आणि साधकांना लाभ होईल ?’, याचा ते सतत अभ्यास करतात अन् साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी साहाय्य करतात.

२ इ. तत्त्वनिष्ठ राहून देवाला अपेक्षित असे घडण्यासाठी प्रयत्न करणे

अनेक वेळा सेवेच्या निमित्ताने त्या त्या क्षेत्रातील अनुभवी साधक चर्चा करतांना कधी कधी वेगवेगळी मते मांडली जातात. त्या वेळी ‘अनुभवी साधकांचा त्या क्षेत्राचा अभ्यास आणि अनुभवही आहे, तर आपले मत कसे मांडायचे ?’, असा माझ्या मनात प्रतिमेचा विचार येतो; परंतु प्रदीपदादा ‘योग्य काय आहे ?’ किंवा ‘कसे असले पाहिजे ?’, हे त्यांना स्पष्टपणे सांगतात. त्यांच्या बोलण्यात ‘देवाला अपेक्षित आहे’, तेच करूया’, असा भाव असतो.

२ ई. कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या, तरी त्यावर उपाय काढणे

प्रदीपदादांना कला, तांत्रिक (टेक्निकल), ‘सोशल मिडिया’, नियोजन किंवा अन्य कुठल्याही सेवांच्या संदर्भात अडचण सांगितली, तरी ते त्यावर उपाय काढतात. त्यामुळे ‘त्यांच्याकडे अडचणी मांडल्यावर निश्‍चित उपाययोजना मिळणार’, असा विश्‍वास सर्व साधकांमध्ये निर्माण झाला आहे.’

३. सायली जाधव आणि श्री. गणेश तांबे

३ अ. नियोजनपूर्वक सेवा करणे

‘प्रदीपदादा सामाजिक प्रसारमाध्यमांच्या संबंधित वेगवेगळ्या सेवा करत असतांना त्यांच्याकडील सर्व सेवांची व्याप्ती त्यांनी काढलेली असते. त्यांना सेवेविषयी काही विचारले, तर ते लगेचच सांगतात. त्यांच्या शब्दकोशात ‘नाही’ हा शब्दच नाही.

३ आ. साधकांविषयी कृतज्ञताभाव

गुरुदेव आणि सहसाधक यांच्याविषयी त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते. त्यांच्यातील निरपेक्ष प्रीती या गुणामुळे त्यांना साधकांविषयी आंतरिक जवळीक जाणवते.

४. प्रदीपदादांमध्ये जाणवलेले पालट

अ. पूर्वीपेक्षा प्रदीपदादांचा तोंडवळा हसरा आणि सात्त्विक वाटत आहे.

आ. ते शांत आणि आनंदी दिसतात.

‘हे गुरुदेवा, ‘प्रदीपदादांमध्ये असलेले सर्व गुण आमच्या अंगी यावेत’, यासाठी तुम्हीच आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या. तुम्ही बहुगुणांनी युक्त असे साधक दिले, त्याविषयी आम्ही सर्व साधक तुमच्या चरणी कृतज्ञ आहोत !’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक