जनतेच्या मनातील भीतीचा काही व्यापारी अपलाभ उठवत असल्याचा आरोप
वैभववाडी – २०२० हे वर्ष कोरोना महामारी आणि दळणवळण बंदी यांमध्येच निघून गेले. मार्च २०२० पासून कोरोना महामारीचे संकट आणि त्या अनुषंगाने वेळोवेळी केलेली दळणवळण बंदी यांमुळे संपूर्ण समाजजीवनच उद्ध्वस्त होते कि काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासन, प्रशासन, कारखानदार, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, विक्रेते, शेतकरी आणि नोकरदार यांची मोठी हानी झाली असली, तरी सर्वांत अधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. यासाठी प्रशासनाने यंत्रणा उभारावी किंवा उभारली असल्यास अधिक सक्षम करावी, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने ई-मेलद्वारे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
वर्ष २०२१ चा प्रारंभ कोरोनामुक्तीने होईल, असे वाटत असतांनाच पुन्हा एकदा कोरोनाने संपूर्ण देशभर थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शनिवार आणि रविवार, असे दोन दिवस दळणवळण बंदी घोषित केली. त्या अनुषंगाने १० आणि ११ एप्रिल हे दोन दिवस दळणवळण बंदीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य मजूर, कामगार आणि सर्वसामान्य ग्राहक यांची मात्र मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. गेल्या मासाभरात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. दोन दिवसांची दळणवळण बंदी आणि भविष्यात कडक दळणवळण बंदी लागू होईल, या सर्वसामान्यांमधील भीतीचा अपलाभ घेऊन काही दुकानदार आणि व्यापारी अधिकच्या मूल्याने माल विकत आहेत. याविषयी प्रशासनाने स्पष्टपणे निर्देश घोषित करावेत. सर्वसामान्य लोकांच्या मनातील भीती दूर करावी अन्यथा यामध्ये सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण होणार आहे. कोरोना संसर्गाच्या वाढीला प्रशासनासह समाजातील काही घटकही तेवढेच उत्तरदायी आहेत. स्थानिक प्रशासनाने याविषयी दक्ष राहून नियम मोडणार्या व्यक्तींवर कारवाई करून नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. कोरोना महामारी आणि दळणवळण बंदी यांतून सर्वांची मुक्तता होण्यासाठी प्रशासनाने व्यापारी महासंघ, ग्राहक संघटना, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्यास जिल्हा कोरोनामुक्त होण्यास साहाय्य होईल, असे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.