काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा भागात ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली’, या लिखाणाचा फलक लावण्यात आला. त्यात ‘शिवरायांचे मुस्लिम मावळे’ असाही उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. हिंदूंच्या धर्मभावना दुखावल्या गेल्यावर कारवाई करण्याकडे (हेतूपुरस्सर ?) दुर्लक्ष केले जाते, असाच अनुभव हिंदूंना वारंवार येतो. गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना ‘धर्मनिरपेक्ष’ या वैचारिक धर्मांतराच्या चौकटीत ओढले जात आहे. हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्या महाराष्ट्रातील हिंदु मावळ्यांचा इतिहास झाकोळून त्याला खोट्या धर्मांधतेची काजळी लावण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत केले जात आहे. अर्थात् हा सत्य इतिहास नसल्याने जागृत हिंदूंकडून सामाजिक माध्यमांवर ‘खोटा इतिहास रेटून धर्मांधांना पुढे काय आणायचे आहे ?’, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आज थेट स्वराज्याच्या राजधानीवर वैचारिक आक्रमण झाले. हे थोपवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
नुकताच गुढीपाडवा झाला. यंदाही काही हिंदुद्वेष्ट्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्न केला. हिंदूंच्या सणांच्या वेळी विकृत इतिहास पसरवून हिंदूंचा बुद्धीभेद केला जातो. याला काही प्रमाणात विरोधही होतो; परंतु या हिंदुद्वेषी शक्तींचा बीमोड करण्याची वेळ आली आहे. यासाठी प्रत्येक हिंदूपर्यंत सत्य इतिहास पोचायला हवा. कुणी कितीही बुद्धीभेद केला, तरी हिंदूंनी त्याला भुलता कामा नये. ही स्थिती निर्माण होण्यासाठी प्रत्येक हिंदु तीव्र धर्माभिमानाने भारित व्हायला हवा.
‘काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती । सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ।’ या ओळी छत्रपती शिवाजी महाराजांचे महत्तम कार्य उद्धृत करतात. हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात मावळ्यांनी योगदान दिले. सध्या इतिहास पालटण्याच्या प्रयत्नांद्वारे धर्मावर वैचारिक आक्रमण केले जात आहे. हे थोपवणे, हेही धर्मकार्यातील योगदानच आहे. हिंदूंनो, चला तर मग सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवूया ! छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या घडीचा मावळा होऊया !!
– श्री. केतन पाटील, पुणे