कुंभपर्वात गोदावरीच्या रामकुंडातील जलात राजयोगी (शाही) स्नान करण्यापूर्वी आणि नंतर होणारा आध्यात्मिक स्तरावरील पालट !

धर्मपरंपरांविषयी नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

१२ एप्रिल २०२१ या दिवशी हरिद्वार येथे चालू असलेल्या कुंभपर्वात द्वितीय पवित्र स्नान आहे. यानिमित्ताने…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

हिंदूंनो, तीर्थक्षेत्रे आणि कुंभपर्वासारख्या हिंदु धर्मपरंपरा यांचे रक्षण करणे, हे धर्मकर्तव्यच आहे !

‘१४ जुलै ते २५ सप्टेंबर २०१५ या कालावधीत त्र्यंबकेश्‍वर, नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्व पार पडले. कुंभपर्वात २८.८.२०१५ या दिवशी गोदावरीतील रामकुंडातील जलाचा नमुना घेतला. त्यानंतर २९.८.२०१५ या दिवशी राजयोगी (शाही) स्नान झाल्यानंतरच्या जलाचा नमुना घेतला. या दोन्ही जलांचा सभोवतालच्या वायूमंडलावर काय परिणाम होतो, हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यासण्याच्या उद्देशाने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

रामकुंड, नाशिक

१. वैज्ञानिक चाचणीशी संबंधित घटकांविषयी माहिती

१ अ. कुंभपर्व : ‘प्रत्येक १२ वर्षांनी प्रयाग, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्‍वर-नाशिक येथे कुंभपर्व असते. कुंभपर्वाच्या वेळी विशिष्ट ग्रहांच्या योगाने निसर्गात निर्माण होणार्‍या वातावरणाचा परिणाम साधना आणि धर्मकृत्ये करण्यासाठी लाभदायक असतो. यासाठी संतमहात्मे आणि भाविकजन कुंभपर्वकाळी कुंभक्षेत्री जातात. कृतयुगामध्ये कुंभपर्वाचा आरंभ झाला. त्याच्या उत्पत्तीची कथा पुराणांमध्ये दिली आहे.

१ आ. गोदावरी नदी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी उगम पावणारी ही नदी गंगा नदीनंतर भारतातील दुसर्‍या क्रमांकाची लांब नदी आहे. ‘जिच्या स्नानाने स्वर्ग प्राप्त होतो, तिला ‘गोदा’ असे म्हणतात. अशा स्वर्ग प्राप्त करून देणार्‍या नद्यांमध्ये जी श्रेष्ठ आहे, ती गोदावरी’, असा ‘गोदावरी’ शब्दाचा अर्थ ‘शब्दकल्पद्रुम’ या ग्रंथात दिला आहे. ‘पवित्रतम’, ‘पुण्यसलिला’, ‘मोक्षदायिनी’ आदी विशेषणांनी गौरवलेल्या या नदीची महती अनेक धर्मग्रंथांत दिलेली आहे.

१ इ. रामकुंड (रामतीर्थ) : हे गोदावरीतील एक प्रमुख तीर्थ आहे. नाशिक येथील पंचवटीमध्ये गोदावरी दक्षिणवाहिनी होते, म्हणजे येथे ती दक्षिणेला वळते. वनवासात असतांना या स्थळी श्रीरामाच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन शिवाने वर दिला होता. तेव्हापासून हे स्थळ ‘रामतीर्थ’ या नावाने प्रसिद्ध झाले.

१ ई. राजयोगी (शाही) स्नान : कुंभपर्वाच्या काळातील काही विशेष तिथींना (पर्वकाळी) पवित्र तीर्थक्षेत्रांत करण्यात येणार्‍या स्नानांना ‘राजयोगी (शाही) स्नान’ म्हणतात.’

(अधिक विवेचनासाठी वाचा : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘गोदावरी माहात्म्य’ आणि ‘कुंभपर्वाचे माहात्म्य’)

२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत राजयोगी स्नानापूर्वीच्या आणि नंतरच्या रामकुंडातील जलाच्या नमुन्यांचे घेतलेले ‘पिप’ छायाचित्र निवडले आहे. ‘या दोन्ही जलांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे या चाचणीतील ‘पिप’ छायाचित्रांच्या तुलनात्मक अभ्यासातून समजले.

२ अ. चाचणीतील ‘पिप’ छायाचित्रांच्या प्रभावळीतील नकारात्मक आणि सकारात्मक स्पंदने दर्शवणारे रंग आणि त्यांचे प्रमाण

टीप १ – घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
टीप २ – घटकाच्या केवळ बाह्य स्तरावरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. दोन्ही प्रकारचे जल प्रयोगासाठी ठेवल्यानंतर सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण वाढले; पण राजयोगी स्नानापूर्वीच्या जलातील सकारात्मक स्पंदनांत झालेली एकूण वाढ स्नानानंतरच्या जलापेक्षा अधिक आहे.

२. राजयोगी स्नानापूर्वीचे जल प्रयोगासाठी ठेवल्यानंतर सूक्ष्म स्तरावरील नामजपादी उपायक्षमता आणि पवित्रता, तर स्नानानंतरचे जल प्रयोगासाठी ठेवल्यानंतर सात्विक तेची स्पंदने दिसू लागली आहेत, म्हणजे दोन्ही प्रकारचे जल प्रयोगासाठी ठेवल्यानंतर प्रभावळीत मूलभूत प्रभावळीत नसलेली सकारात्मक स्पंदने दिसत आहेत.

३. दोन्ही प्रकारचे जल प्रयोगासाठी ठेवल्यानंतर नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण घटले; पण राजयोगी स्नानानंतरचे जल प्रयोगासाठी ठेवल्यानंतर नकारात्मक स्पंदनांपैकी तणावाच्या स्पंदनांचे प्रमाण वाढले. (आध्यात्मिकदृष्ट्या नकारात्मक स्पंदने असणार्‍या व्यक्तींनी रामकुंडात स्नान केल्यामुळे तसे झाले आहे, हे ‘सूत्र ४ इ १’ मधील विश्‍लेषणातून स्पष्ट होते.)

वाचकांना सूचना

जागेअभावी या लेखातील ‘पिप’ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे’, ‘चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता’, ‘प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती’ इत्यादी नेहमीची सूत्रे https://www.sanatan.org/mr/PIP या सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील लिंकवर दिली आहेत.

श्री. रूपेश रेडकर

३. निष्कर्ष

राजयोगी स्नानापूर्वीचे आणि नंतरचे रामकुंडातील जल अभ्यासल्यावर लक्षात येते की,

अ. दोन्ही जलांमधून परस्पर भिन्न प्रकारची; पण भाविकांना आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणारी (सकारात्मक) स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत.

आ. स्नानानंतरच्या जलापेक्षा स्नानापूर्वीच्या जलातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक आहे. (यामागील कारण ‘सूत्र ४ इ १’ मध्ये स्पष्ट केले आहे.)

४. रामकुंडातील जलामध्ये सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात असण्यामागील कारणे

४ अ. कालमाहात्म्य (विशिष्ट काळाचा असणारा परिणाम)

४ अ १. ज्योतिषशास्त्रदृष्ट्या : ‘सिंह राशीत गुरु आणि सिंह राशीतच सूर्य असतांना त्र्यंबकेश्‍वर आणि नाशिक येथे सिंहस्थ कुंभपर्व असते. असा ग्रहयोग प्रत्येक १२ वर्षांनी येतो. पुराणांनुसार सिंह राशीत गुरु असतांना गोदावरी नदी अवतरली. त्यामुळे सिंहस्थ कुंभपर्व आणि गोदावरीचा जन्मकाल एकच आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

४ अ २. वैज्ञानिकदृष्ट्या : कुंभपर्वाच्या वेळी कुंभपर्वाच्या ठिकाणच्या नद्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या (कॉस्मिक एनर्जीच्या) प्रभावामुळे आरोग्यवर्धक होतात, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

४ आ. क्षेत्रमाहात्म्य : देवनदी गोदावरी पंच महातीर्थांपैकी एक आहे. नाशिक, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य आणि गया मिळून पाच तीर्थक्षेत्रे होतात.

४ इ. देवता, अवतार आणि संत यांचे वास्तव्य : नद्यांच्या पुण्यक्षेत्री देवता, ऋषिमुनी, पुण्यात्मे यांचा वास असतो. गोदावरीच्या काठावर यज्ञवेत्त्या ऋषीमुनींनी वास्तव्य केले आणि प्रभु श्रीरामचंद्रांनी सीतेसह १२ वर्षे निवास केला. येथे कुंभपर्वाच्या निमित्ताने विविध योगमार्गांतील साधूसंत एकत्र येतात. त्यांच्या सत्संगांचाही वातावरणावर परिणाम होतो.’

(अधिक विवेचनासाठी वाचा : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘गोदावरी माहात्म्य’ आणि ‘कुंभपर्वाचे माहात्म्य’)

४ इ १. संतांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या सात्विक स्पंदनांमुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य टिकून रहाण्यास साहाय्य होणे : कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीमध्ये रज-तम गुणांचे, तर संतांमध्ये (आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांमध्ये) सत्वगुणाचे प्रमाण अधिक असते. तीर्थक्षेत्रातील जलामध्ये सत्वगुणाचे प्रमाण अधिक असते आणि त्याचा लाभ त्या जलात स्नान करणार्‍या व्यक्तीला होतो. त्यामुळे तीर्थस्नानानंतर सर्वसाधारण व्यक्तीच्या देहातील रज-तम गुणांचे प्रमाण घटते आणि सत्वगुणाचे प्रमाण वाढते. यालाच ‘पापक्षालन होणे’, असे म्हणतात. सर्वसाधारण व्यक्ती नियमितपणे साधना करणारी नसल्याने तीर्थस्नानाने वाढलेली त्याच्या देहाची सात्विक ता अधिक काळ टिकून रहात नाही.

सर्वसाधारण व्यक्तीने तीर्थात स्नान केल्याने त्याच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या रज-तम गुणांमुळे त्या जलातील रज-तम गुणांचे प्रमाण वाढते. (यामुळेच ‘पिप’ चाचणीत स्नानानंतरच्या जलातून नकारात्मक स्पंदनांपैकी भावनिक तणावाच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ वाढलेले दिसले.) याउलट सत्वगुणप्रधान संतांनी तीर्थात स्नान केल्यास जलातील सात्विक ता वाढते. अशा प्रकारे संतांमुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य टिकून रहाण्यास साहाय्य होते.

५. देवनदी गोदावरीचे रक्षण करा !

गोदावरीत सांडपाणी सोडले जाणे, भाविकांनी कचरा टाकणे आदी कारणांमुळे ती प्रदूषित होत आहे. तिच्या पावित्र्याचीही हानी होत आहे. त्यामुळे ही पवित्र नदी प्रदूषित होण्यापासून थांबवणे, हे धर्मकर्तव्यच आहे !’

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२३.९.२०१५)

ई-मेल : [email protected]

कोणतेही स्थूल उपकरण न वापरता अध्यात्मशास्त्राविषयी ज्ञान देणारे संतच विज्ञानापेक्षा श्रेष्ठ !

‘देवनदी गोदावरी, कुंभपर्व, कुंभपर्वाच्या काळातील पर्वस्नान, त्यामुळे होणारे पापक्षालन आदींविषयी प्राचीन ऋषीमुनी आणि सांप्रत काळातील संत यांनी लिहून ठेवले आहे. त्यांना मिळालेले ज्ञान कोणत्याही स्थूल उपकरणामुळे नव्हे, तर साधनेने प्राप्त झाले होते. येथे ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाच्या आधारे करण्यात आलेल्या चाचणीत त्यांनी मिळवलेल्या अथांग ज्ञानातील केवळ अंशमात्र ज्ञानाची सत्यता जाणता आली. यावरूनच संतांनी कोणतेही स्थूल उपकरण न वापरता सूक्ष्मातून जाणलेले किती योग्य आहे, तेच लक्षात येते !’

ग्रहगणितामुळे कुंभपर्वक्षेत्रीचे गंगादी जलस्रोत आरोग्यवर्धक होणे

‘विशिष्ट तिथी, ग्रहस्थिती आणि नक्षत्र यांच्या योगावर येणार्‍या कुंभपर्वाच्या वेळी ब्रह्मांडीय ऊर्जेचा (कॉस्मिक एनर्जीचा) प्रभाव प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक येथील गंगादी पवित्र नद्या आणि त्यांच्या ४५ कि.मी. परिघातील सर्व जलस्रोत आकाशीय विद्युत्-चुंबकीय प्रभावाच्या चिकित्सकीय गुणांनी युक्त होतात, तसेच त्यांतील जल कुठल्याही विद्युत्र्ोधक वस्तूंच्या (लाकूड, प्लास्टिक, काच इत्यादींच्या) पात्रात ठेवूनही त्यांचा हा गुण अनेक दिवस टिकून रहातो, असे आधुनिक अवकाश वैज्ञानिक आणि भौतिकतज्ञ यांनी संशोधनाअंती मान्य केले आहे.’ (संदर्भ : हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ग्रंथ ‘कुंभपर्वाचे माहात्म्य’, पृष्ठ १२)

यावरून ‘कुंभपर्वाच्या निमित्ताने एक मास असणार्‍या कुंभमेळ्यांना वैज्ञानिक आधार आहे’, हे लक्षात येते.’

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक