‘वर्ष १९९९ पासून श्री. परशुराम प्रभुदेसाई यांनी साधनेला आरंभ केला. त्यांच्या घरी ३ मास सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वास्तव्याला होते. त्या कालावधीत त्यांना अनेक संतांचा सहवास लाभला. श्री. प्रभुदेसाई यांनी निवृत्तीनंतर दायित्व घेऊन सेवा केल्या. ‘गुरुदेवांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया शिकवून मला घडवले’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
या साधनाप्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) यांचीही उत्तम साथ लाभली. श्री. प्रभुदेसाई यांनी साधनेचे प्रयत्न करून २९.३.२०२६ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या लेखात आपण श्री. प्रभुदेसाई यांचा साधनाप्रवास जाणून घेऊया.

१. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वीचे जीवन
‘माझा जन्म गोव्यातील लोलये, काणकोण येथील सारस्वत कुटुंबात झाला. मी ६ वर्षांचा असतांना माझ्या वडिलांचे निधन झाले. ‘ते दानशूर होते’, असे लोक सांगतात. आई, बहीण आणि भाऊ यांनी मला वाढवले. मी दहावीपर्यंत गावात शिक्षण घेतले आणि नोकरीसाठी म्हार्दोळला आलो अन् तेथेच स्थायिक झालो. मी मंदिरात जात होतो आणि कुलाचारांचे पालन करत होतो.
२. सनातन संस्थेच्या संपर्कात येणे
वर्ष १९९८ – १९९९ या कालावधीत आमच्या जीवनात एक कठीण प्रसंग घडला. त्यात आम्हाला पुष्कळ मानसिक त्रास झाला. आम्हाला घराबाहेर जाणेही धोक्याचे झाले होते. त्या वेळी माझी पत्नी (सौ. पूनम प्रभुदेसाई) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागली. तिच्या माध्यमातून नकळत मीही सनातन संस्थेशी जोडलो गेलो.
मी पत्नी करत असलेल्या साधनेला विरोध केला नाही. मला साधनेची तेवढी आवड नव्हती. मी नोकरी आणि व्यावहारिक गोष्टी यांकडे अधिक लक्ष देत असे.
३. दुचाकी गाडीवरून जातांना ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप केल्यामुळे मार्गात साप आडवा न येणे अन् नामजपाचे महत्त्व लक्षात येणे
सत्संगात सांगितल्यानुसार पत्नीने मला ‘कुलदेवता आणि दत्त’ यांचा नामजप करायला सांगितला. मी त्यानुसार नामजप करत असे. मी शिक्षक होतो. मी दुचाकी गाडीवरून शाळेत जात होतो. त्यात मला वनातील अर्धा कि.मी. मार्ग पार करावा लागत असे. त्या वेळी मार्गात साप आडवे येत असत. तेव्हा मला भीती वाटत असे. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करत दुचाकी गाडीवरून गेल्यावर एकदाही वाटेत साप आडवा आला नाही. तेव्हा नामजपाचे महत्त्व माझ्या लक्षात आले.
४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या घरातील वास्तव्याने सर्व कुटुंबीय प्रीती आणि चैतन्य यांनी न्हाऊन निघणे
१.४.२००१ या दिवशी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) चरण आमच्या वास्तूला लागले. ते आमच्या घरी आल्यावर ‘एक थोर विभूती आली आहे’, असे मला वाटले. ‘साधू संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।’ हे प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य गुरुदेवांनी आम्हाला दिले. त्यांचे आमच्या म्हार्दाेळ येथील घरी ३ मास वास्तव्य होते. तेव्हा आमचे कुटुंब चैतन्यात न्हाऊन निघाले. गुरुदेव आमची आपुलकीने विचारपूस करत असत. आम्ही त्यांची अनुभवलेली प्रीती शब्दात मांडू शकत नाही.
५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे लाभलेला संतांचा सत्संग
गुरुदेवांमुळेच आम्हाला संतांचे दर्शन घडले आणि त्यांचे चरण आमच्या वास्तूला लागले. गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला प.पू. रामानंद महाराज, मुंबई येथील प.पू. जोशीबाबा, पू. उत्तम बाबा, पू. हसरे महाराज, अशा बर्याच संतांना जवळून पहाण्याची संधी मिळाली. गुरुदेव, तसेच प.पू. जोशीबाबा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला त्यांचे औक्षण करण्याची सेवा मिळाली. हे आमचे परम भाग्यच आहे आणि ते केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला लाभले.
६. केलेल्या समष्टी सेवा
अ. मी माध्यमिक शाळेत शिक्षक असल्याने मला सेवेसाठी वेळ देता येत नव्हता. आमच्या घरी सनातनचे ग्रंथ आणि नामपट्टी यांचा साठा असे. मी त्या संबंधित सेवा करत असे, उदा. साठा ठेवणे, मागणीनुसार वितरण करणे.
आ. मी सेवानिवृत्त झाल्यावर पूर्णवेळ सेवा करू लागलो. तेव्हा मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त गोवा राज्यातील गुरुपौर्णिमा आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या दिवशी दायित्व घेऊन सेवा करत असे. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या अंतर्गत गोवा राज्यातील विविध सभांच्या ठिकाणी सिद्धता करत असे. ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सेवेच्या अंतर्गत भोजन व्यवस्था पहात असे.
इ. आता वयोमानामुळे मला घराबाहेर जाऊन सेवा करणे शक्य होत नाही. मी घरी राहून थोडीफार सेवा करत आहे.
७. हृदयाचे शस्त्रकर्म गुरुकृपेने यशस्वी होणे आणि गुरुकृपेमुळे पूर्वीप्रमाणे सेवा करता येणे
डिसेंबर २०१२ मध्ये मला हृदयविकाराचा सौम्य झटका आला. मला रुग्णालयात भरती केल्यावर आधुनिक वैद्यांनी माझे ‘बायपास’ शस्त्रकर्म (हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर अडथळे (ब्लॉकेज) असल्यास रक्तपुरवठा सुरळीत करण्यासाठी केले जाणारे जीवनरक्षक शस्त्रकर्म) करायला सांगितले. गुरुदेवांच्या कृपेने माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर मी सुखरूप घरी आलो. तेव्हा आधुनिक वैद्य मनोज सोलंकी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६० वर्षे) यांनी मला पुष्कळ साहाय्य केले. त्या वेळी मला समष्टी सेवा करता येत नव्हती. त्यामुळे मला खंत वाटत असे. त्यानंतर १ – २ वर्षांनी मला पूर्वीप्रमाणे सेवा करता येऊ लागली. हे केवळ गुरुकृपेमुळेच शक्य झाले.
८. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून साधनेच्या संदर्भातील शंकाचे निरसन होणे
माझ्या मनात साधनेविषयी एखादी शंका आली, तर दुसर्या दिवशी त्याचे उत्तर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मला वाचायला मिळत असे. त्यामुळे ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेतील शंकाचे निरसन गुरुदेव लगेच करतात’, हे मी आणि माझ्या पत्नीने अनुभवले आहे.
९. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रिये’चा लाभ होणे
गुरुदेवांनी आम्हाला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया शिकवून घडवले. मला माझ्यातील रागावर नियंत्रण ठेवता आले. गुरुदेवांनी मला साधक कुटुंब देऊन एक मोठी कृपाच केली आहे. मी माझ्या पत्नीमुळे साधनेत टिकून आहे. तिने मला पुष्कळ साहाय्य केले. ती मला माझे स्वभावदोष आणि चुका दाखवत असे. त्यामुळे मला माझ्या स्वभावदोषांवर थोडीफार मात करता आली. ‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया माझ्यासाठी वरदान ठरली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.
१०. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने पती-पत्नी यांची एकाच दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित होणे
गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे आमचे कुटुंब सुखासमाधानाने जगत आहे. त्यांच्या कृपेमुळेच आम्ही जिवंत आहोत. गुरुदेवांनी माझी आणि पत्नीची एकाच दिवशी (२९.३.२०२६ या दिवशी) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करून आमच्यावर अपार कृपेचा वर्षाव केला आहे.
‘प.पू. गुरुदेवांनी माझ्याकडून हे लिखाण लिहून घेतले’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे), म्हार्दाेळ, गोवा. (२४.५.२०२६)
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
हिंदु धर्मप्रेमी युवक-युवतींनो, ऋषिमुनी आणि देवता यांनी केलेल्या स्थुलातील कृतीमागील सूक्ष्म धर्मशास्त्र समजून न घेताच त्यांचे अनुकरण करू नका ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘श्रीसत्शक्ति, श्रीचित्शक्ति आणि सच्चिदानंद’, हे अध्यात्मातील शब्दब्रह्म असून त्यात पुष्कळ शक्ती असणे अन् ते शब्द उच्चारल्यावर त्यातून शक्ती, चैतन्य अन् तत्त्व मिळणे – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !