वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील काशी विश्वनाथ मंदिरासमोरील ज्ञानवापी मशिदीचे पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण आणि उत्खनन करण्यास वाराणसी जलदगती न्यायालयाने अनुमती दिली. त्यानंतर मुसलमानांच्या संघटना आणि नेते यांच्याकडून प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने म्हटले आहे की, ते न्यायालयाच्या या निर्णयाला वरच्या न्यायालयात आव्हान देणार आहेत, तर एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही यास विरोध केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मशीद समिती यांनी त्वरित याला आव्हान दिले पाहिजे; कारण पुरातत्व विभागाकडून फसवणूक होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे बाबरी मशिदीचे झाले, तो इतिहास येथे पुन्हा घडवला जाऊ शकतो. (श्रीरामजन्मभूमीवरील उत्खननात जे सापडले ते उघड होते आणि सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केले, तरीही त्यावर ओवैसी प्रश्न उपस्थित करत असतील, तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. यासाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)