सांगली, ११ एप्रिल (वार्ता.) – मुख्यमंत्र्यांनी दळणवळण बंदी घोषित करण्याचे संकेत दिले आहेत. ही बंदी घोषित करण्यापूर्वी काही गोष्टींची पूर्तता होणे अत्यावश्यक आहे. जसे कोरोना पडताळणीचा अहवाल तात्काळ देणे, छोट्या घटकांना आर्थिक साहाय्य देणे, सरकारी आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे. तरी सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी घोषित करण्यापूर्वी या गोष्टींचे नियोजन करण्यात यावे, या मागणीचे निवेदन भाजप आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना ११ एप्रिल या दिवशी दिले.
पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना चाचण्यांचे अहवाल ४ दिवसांनी येत आहेत. ते पूर्वीप्रमाणे २४ घंट्यांत येण्यासाठी प्रयत्न व्हावेत. सांगलीत २ वर्षे महापूर आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे व्यापारी अन् अनेक घटकांना मोठ्या प्रमाणात हानीस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यांच्या हानीचे दायित्व सरकारने घेतले पाहिजे. ग्रामीण भागातही सुविधा वाढवण्यावर भर दिला पाहिजे. जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय सरकारने घ्यावा.