संगीतातील विविध प्रयोगांच्या वेळी जाणवलेली सूत्रे

२४.९.२०१८ या दिवशी तमिळनाडू येथील वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि वेदमूर्ती राजकुमार शिवम् यांनी सनातनच्या रामनाथी आश्रमात झालेल्या धन्वन्तरि यागाच्या वेळी म्हटलेला श्री प्रत्यंगिरादेवीचा मंत्र, सामवेद गायन आणि अथर्ववेदातील मंत्र अन् २५.९.२०२० या दिवशी रामनाथी आश्रमातील पुरोहित साधक यांनी म्हटलेली विष्णुस्तुती यांच्या ध्वनीफिती आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना ऐकवण्यात आल्या. ‘त्याचा त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला. या वेळी कु. रूपाली कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहोत.

१. विविध मंत्रांचे प्रयोग ऐकतांना जाणवलेली सूत्रे

कु. रूपाली कुलकर्णी

१ अ. प्रत्यंगिरा मंत्र ऐकतांना : ‘२४.९.२०१८ या दिवशी आम्हाला प्रत्यंगिरादेवीचा मंत्र ऐकवण्याचा प्रयोग करण्यात आला. माझी प्रयोगाला येण्यापूर्वी पुष्कळ चिडचिड होत होती. प्रयोगाच्या वेळी मी प्रत्यंगिरा मंत्र ऐकत असतांना मला झोप येत होती. मला मंत्र ऐकतांना ‘मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीची शक्ती न्यून झाली आहे’, असे जाणवले. मला प्रयोगाच्या शेवटी शरिरात पोकळी जाणवून थंडावा वाटत होता. मला प्रयोगानंतर थकवा जाणवला.

१ आ. सामवेद गायन : मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीची शक्ती प्रत्यंगिरा मंत्राच्या प्रयोगामुळे न्यून झाली होती. त्यामुळे मला ‘सामवेद मंत्रगायन ऐकतांना चांगले वाटत आहे’, असे मला वाटले. मला सामवेद गायन ऐकतांना ‘प्राणशक्ती मिळत आहे’, असे वाटले. माझ्या मनाला उत्साह जाणवत होता.

१ इ. अथर्ववेद मंत्र : मी हे मंत्र ऐकत असतांना ‘हे मंत्र कोणते आहेत ?’, हे मला ठाऊक नव्हते. मला ५ ते १० मिनिटांनंतर ‘मंत्र ऐकू नयेत’, असे वाटू लागले. त्या वेळी माझी चिडचिड होत होती, तरीही मी डोळे मिटून शांत रहाण्याचा प्रयत्न करत होते. मला हे मंत्र ऐकतांना वेळ संपत नव्हता आणि ‘हे मंत्र कधी संपणार ?’, असे वाटत होते. ‘लढण्यासाठी वाईट शक्तीची शक्ती न्यून पडत आहे’, असे मला जाणवले.

२. सध्याचे संगीत भाव आणि भावना यांचे संमिश्रिकरण असल्याचे जाणवणे

मला आतापर्यंत झालेल्या संगीत प्रयोगात (श्री. चिटणीस यांनी गायलेले राग, कु. मधुरा चतुर्भूज किंवा कु. दुर्गा कद्रेकर यांनी गायलेली गाणी) गाण्यांचे शब्द कळत होते. त्यांचा मनावरील परिणाम जाणवायचा; कारण श्री. चिटणीस हे प्रयोगात शरीर शिथील करायला सांगायचे आणि तशी सूचना द्यायचे. त्यामुळे मला शरीर शिथील झालेले अनुभवता येत होते. मला ‘आतापर्यंतच्या प्रयोगांत ऐकलेली गाणी ही भाव आणि भावना यांचे संमिश्रिकरण होते’, असे वाटले. त्यामुळे प्रयोगाला बसल्यावर जाणवलेल्या सूत्रांचे विश्‍लेषण करता यायचे.

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. वेदमंत्र हे भाव-भावनांच्या पलीकडचे असल्यामुळे ते ऐकतांना कोणतेही प्रयत्न न करता मनाची शांती अनुभवता येणे : आज वेदमंत्र ऐकतांना ते संस्कृत आणि दक्षिण भारतात म्हणतात, त्या कर्नाटकी पद्धतीने म्हटलेले होते. ते मंत्र ऐकतांना मला त्यांतील शब्द किंवा अर्थ काहीच कळत नव्हते, तरीही माझे शरीर आणि मन यांचे शिथिलीकरण आपोआप होत होते. मला त्यासाठी वेगळे काही करावे लागत नव्हते. माझ्या मनात काहीच भाव- भावना नव्हत्या. माझे मन मंत्र ऐकतांना शांत होत होते. ‘मी मनाच्या स्तरावर भाव ठेवून मंत्र ऐकले’, असेही काही करत नव्हते, तरीही सर्व आपोआप होत होते. त्यामुळे ‘भाव- भावना यांच्यापेक्षा उच्च स्तरावर वेदमंत्र आहेत’, असे मला वाटले. त्यामुळे उपायांची परिणामकारकता अधिक जाणवली.

३ आ. या संगीताच्या प्रयोगात ‘आध्यात्मिक त्रास नसणारे आणि उच्च आध्यात्मिक पातळी असणारे साधक किंवा संत यांना उच्च स्तरावरील अनुभूती येत असतील’, असे वाटणे : माझ्या मनात विचार आला, ‘मला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास आहेत अन् मला परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे हे सर्व अनुभवता आले आहे. मग त्रास नसणार्‍या आणि उच्च आध्यात्मिक पातळी असणार्‍या साधकांना किंवा संतांना किती उच्च स्तरावरील अनुभूती येत असतील !’

३ इ. आलेल्या अनुभूतींवरून देव मला ‘ऋषिमुनींनी केलेले यज्ञ आणि त्यांची महानता लक्षात आणून देत आहे’, असे वाटले.

३ ई. प्रयोग संपल्यावर काही न आठवणे किंवा अनुभवताही न येणे : २४.९.२०१८ या दिवशी रात्री ११ वाजता वेदमंत्रांचे प्रयोग संपले. त्यानंतर मी झोपायला गेले. मी रात्री १२ वाजता ते सर्व आठवण्याचा किंवा अनुभवण्याचा प्रयत्न केला; परंतु मला ते काहीच आठवले नाही किंवा अनुभवताही आले नाही.

४. विष्णुस्तुती

२५.९.२०१८ या दिवशी प्रयोगात मी (सनातनच्या पुरोहित साधकांनी म्हटलेली) विष्णुस्तुती ऐकत होते. मी थोडाच वेळ विष्णुस्तुती ऐकली आणि मला झोप लागली. ती ऐकतांना माझे मन शांत झाले आणि माझ्या मनात कोणतेही विचार आले नाहीत.’

– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.९.२०१८)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक