साधकाने अनुभवलेला गुरुकृपेचा वर्षाव !

श्री. गुणवंत चंदनखेडे

‘माझ्या जीवनात गुरुकृपेचा वर्षाव कसा झाला !’, याविषयीचा लेख मी शरणागतभावाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करत आहे.

१. गुरुमाऊलीचा लाभलेला सत्संग !

१ अ. प.पू. गुरुमाऊलीने सत्संगात ‘तन, मन आणि धन यांचा त्याग कसा करायचा’, हे सांगितल्यावर त्यांचे शब्द मनात कोरले जाणे अन् तेव्हापासून सेवेसाठी स्वतःचे चारचाकी वाहन उपलब्ध करून देणे : प.पू. गुरुदेव प्रथम चंद्रपूर येथे आले असतांना मला त्यांचा सत्संग ऐकण्याची आणि त्यांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्या भेटीतच गुरुमाऊलीचा झालो. प.पू. गुरुमाऊलीने सत्संगात ‘तन, मन आणि धन यांचा त्याग कसा करायचा ?’, हे सांगितले. त्यांचे शब्द माझ्या मनात कोरले गेले. तेव्हापासून मी सत्संग, गुरुपौर्णिमा आणि ग्रंथप्रदर्शन या सेवांसाठी माझे चारचाकी वाहन उपलब्ध करून देऊ लागलो, तसेच साधकांना ज्या वस्तूंची आवश्यकता भासत असे, त्या वस्तू माझ्या घरी असतील, तर त्याही देऊ लागलो.

१ आ. गुरुमाऊलीचा दुसर्‍यांदा लाभलेला सत्संग

१ आ १. स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करत नसल्याने प.पू. गुरुदेवांच्या सत्संगाला येण्याची अनुमती नसणे; मात्र गुरुमाऊलीच्या दर्शनाची ओढ मनात असल्याने ते पुढील प्रवासाला जातांना त्यांना मार्ग दाखवण्याची सेवा मिळणे : वर्ष २००५ मध्ये प.पू. गुरुदेव चंद्रपूर येथे आले होते. तेव्हा त्यांच्या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून देण्याची सेवा मला मिळाली होती. मी ती सेवा पूर्ण केली; पण प.पू. गुरुदेव सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मी करत नसल्याने मला सत्संगासाठी सभागृहात येण्याची अनुमती नव्हती. तेव्हा मला वाईट वाटून खंतही वाटली, तरी प.पू. गुरुमाऊलीच्या दर्शनाची ओढ माझ्या मनात होती. गुरुमाऊलीने ते जाणून दुसर्‍या दिवशी ते चंद्रपूरहून पुढील प्रवासाला जातांना त्यांना मार्ग दाखवण्याची सेवा मला मिळाली.

१ आ २. गुरुमाऊली निवासाला असलेल्या ठिकाणी गुरुमाऊलीने स्मितहास्य करत दर्शन देणे आणि त्यांना मुख्य मार्गापर्यंत पोचवून परत निघाल्यावर त्यांनी हात हलवून निरोप देणे अन् त्या वेळी त्यांनी पुढील साधनेचा मार्गच दाखवल्याचे जाणवणे : मी गुरुमाऊली जिथे निवासाला होती, तिथे जाऊन प्रथम मी त्यांच्या पिवळ्या रंगाच्या चारचाकीचे दर्शन घेतले. थोड्या वेळानंतर पांढर्‍या शुभ्र वेशातील आणि गळ्यात स्फटिकांची माळ घातलेल्या गुरुमाऊलीने स्मितहास्य करत मला दर्शन दिले. ते रूप मी माझ्या डोळ्यांत साठवत शरणागतभावाने त्यांना नमस्कार केला. तेव्हा गुरुमाऊलीने आशीर्वाद दिल्याचे मला जाणवले. त्यांना मुख्य मार्गापर्यंत पोचवून मी परत निघालो. तेव्हा गुरुमाऊलीने हात हलवत मला निरोप दिला. ‘त्यामुळे मला चैतन्य मिळाले’, असे जाणवले. ‘एवढेच नाही, तर त्यांनी मला पुढील साधनेचा मार्ग दाखवला’, असेही जाणवले. मी या कृपेसाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

२. देवद आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांचा लाभलेला सत्संग

२ अ. सहकुटुंब देवद आश्रमात गेलो असतांना परात्पर गुरु पांडे महाराज यांची भेट होणे, त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला सांगणे आणि ‘तो स्वतःसाठी आशीर्वादच आहे’, असे वाटणे : मी स्थापत्य अभियंता असून माझा ‘बांधकामांचे कंत्राट घेणे’, हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय करतांना मी साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे, ग्रंथप्रदर्शनाची सेवा करणे आणि विज्ञापने मिळवणे, अशा सेवा करायला लागलो. एकदा मी सहकुटुंब देवद आश्रमात गेलो असतांना माझी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी भेट झाली. त्यांनी सांगितले, ‘‘मी स्थापत्य अभियंता असून पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता होतो.’’ त्यांनी मला दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला सांगितले. माझ्यासाठी त्यांचा तो आशीर्वादच होता.

३. पत्नीलाही साधनेची गोडी लागणे, संत आणि सद्गुरु घरी निवासाला असल्याने वास्तू चैतन्यमय होणे अन् आता ते चंद्रपूर सेवाक्रेंद्र होणे

माझ्या पत्नीलाही हळूहळू साधनेची गोडी लागली. घरी सत्संगाची सिद्धता करणे आणि साहित्य ठेवणे, अशा सेवा करण्याचीही संधी मला मिळाली. नंतरच्या काळात परात्पर गुरु देशपांडेकाका, सद्गुरु सत्यवान कदम, सद्गुरु राजेंद्रदादा शिंदे, सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सद्गुरु नंदकुमार जाधव आणि पू. अशोक पात्रीकर यांची निवासव्यवस्था अनेक वेळा आमच्या घरी होत असल्याने ही वास्तू चैतन्यमय झाली. हे आता चंद्रपूरचे सेवाकेंद्र झाले आहे.

४. गुरुचरणी केलेली प्रार्थना !

‘प.पू. गुरुमाऊली, आपणच माझ्या हृदयात विराजमान आहात. कर्ते करवितेही आपणच आहात. मी आणि माझे कुटुंब आपल्या चरणी शरण आलो आहे. आम्हाला आपल्या चरणांचे धूलीकण बनवा आणि त्या माध्यमातून आम्हाला आपल्या चरणांजवळ ठेवा. आपण माझ्यातील जन्मोजन्मींचे स्वभावदोष आणि अहं नष्ट करा. माझ्या जन्माचे सार्थक होऊ द्या. आपल्याच कृपेने मी हे लिहू शकलो. मी ते आपल्या चरणी समर्पितभावाने अर्पण करतो.’

– श्री. गुणवंत चंदनखेडे, चंद्रपूर (९.२.२०२१)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

आपत्काळात साधकांच्या निवासासाठी निरपेक्षपणे आणि तळमळीने प्रयत्न करणारे श्री. चंदनखेडेकाका !

आपत्काळात सुरक्षित रहाण्यासाठी साधक काही ठिकाणी स्थलांतर करत आहेत. अशा संकटकाळात साधकांना एकत्रित राहून चांगली साधना करता यावी, यासाठी श्री. चंदनखेडेकाकांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या जागेत वास्तू उभारण्याचा निर्णय घेतला. ‘साधक ही गुरूंची लेकरे आहेत आणि त्यांच्या निवासासाठी उभारण्यात येणारी वास्तू म्हणजे सनातनचा आश्रमच आहे’, असा त्यांचा भाव आहे. श्री. चंदनखेडेकाका यांचा साधनाप्रवास पाहिल्यावर त्यांच्यात प्रेमभाव असून ते साधकांसाठी निरपेक्षपणे कृती करतात, हे लक्षात येते. ते करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

असे समष्टीभाव असणारे श्री. चंदनखेडेकाका यांची उत्तरोत्तर प्रगती होवो, हीच गुरुचरणी प्रार्थना !

– (श्रीसत्‌शक्‍ति ) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आपत्काळात साधकांच्या निवासासाठी शेतात वास्तू बांधण्याचे नियोजन करणारे श्री. चंदनखेडेकाका !

१. सनातनवर बंदीचे संकट येण्याची शक्यता असल्याने साधकांना स्थलांतर करण्यासाठी निवासाची आवश्यकता असणे, घरी ७ – ८ साधक राहू शकत असल्याचे कळवणे आणि ‘आणखी साधक राहू शकतील’, असे बांधकाम शेतात चालू करणे अन् देवाच्या कृपेने बंदीचे संकट टळणे

वर्ष २००९ मध्ये ‘सनातनवर बंदीचे संकट येण्याची शक्यता असल्याने साधकांना स्थलांतर करावे लागेल. तेव्हा साधकांची अन्यत्र निवासाची सोय होऊ शकते का ?’, अशा आशयाची चौकट दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाली होती. आमचे घर थोडे मोठे असल्याने ‘आमच्या घरी ७ – ८ साधक राहू शकतील’, असे आम्ही कळवले. त्याच वेळी ‘अन्य साधकांच्या निवासाचे काय ?’, असा विचार माझ्या मनात आला आणि ‘त्यांची व्यवस्था आमच्या शेतात होऊ शकते’, हा विचार प.पू. गुरुमाऊलीने सूक्ष्मातून माझ्या मनात घातला. ‘बंदीचे संकट दाराशी आले असल्याने मी तत्परतेने निर्णय घेऊन ३० ते ४० साधक राहू शकतील’, असे बांधकाम शेतात चालू केले. नंतरच्या काळात देवाच्या कृपेने बंदीचे संकट टळले आणि शेतातील बांधकाम अर्धवट राहिले.

२. ‘यापूर्वी चालू केलेले शेतातील अर्धवट अवस्थेतील बांंधकाम पूर्ण केल्यास ते साधकांना लाभदायक होईल’, असा विचार मनात येणे आणि त्यावर उत्तरदायी साधकांनी ‘निर्णय घेऊ शकता’, असे सांगणे

‘चंद्रपूर हे गाव कोळशांच्या खाणींवर वसले असल्याने कोरोना महामारीच्या नंतर येणार्‍या आपत्काळात ते धोकादायक आहे’, असे सर्व साधकांच्या लक्षात आले आणि ‘स्थलांतर करावेच लागेल’, या निर्णयाप्रत साधक आले; ‘पण स्थलांतर कुठे होणार ?’, ही शंका सर्वांना होती. तेव्हा ‘यापूर्वी चालू केलेले शेतातील अर्धवट अवस्थेतील बांंधकाम पूर्ण केल्यास ते साधकांना लाभदायक होईल’, असा विचार प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने माझ्या मनात आला. उत्तरदायी साधकांनी घेतलेल्या सत्संगात मी हा विचार त्यांना सांगितला. त्यांनी ‘तुम्ही निर्णय घेऊ शकता’, असे सांगितल्यावर मी चंद्रपूर येथील साधकांशी चर्चा केली आणि साधकांकडून योगदान मिळण्याची काही दिवस वाट पाहिली; पण नंतर माझ्या लक्षात आले, ‘साधकांची आर्थिक योगदान करण्याची स्थिती नाही.’

३. ‘स्वतःकडे असलेले धनही गुरुधनच असल्याने ते गुरुमाऊलीच्या लेकरांसाठी वापरले, तर गुरुमाऊलीला आनंदच होईल, त्यामुळे भावी आपत्काळात सर्व लेकरांना गावाजवळ एकत्रित राहून साधना करण्याची आणि आश्रमजीवन अनुभवण्याची संधी मिळणार असणे’, असे विचार मनात येणे

आपत्काळाला अल्प वेळ असल्यामुळे माझ्या मनात चलबिचल चालू झाली. ‘हे सर्व साधक माझे गुरुबंधू आहेत. आम्ही सर्व साधक एकाच कुटुंबातील गुरुमाऊलीची लेकरे आहोत. सर्व साधक मिळूनच गुरुमाऊलीला आळवतो आणि त्यांचे चरण घट्ट पकडतो. मग माझ्याकडे असलेले धनही गुरुधनच आहे. ते धन आपण या गुरुमाऊलीच्या लेकरांसाठी वापरले, तर गुरुमाऊलीला आनंदच होईल. त्यामुळे भावी आपत्काळात आम्हा सर्व लेकरांना आमच्याच गावाजवळ एकत्रित राहून साधना करण्याची आणि आश्रमजीवन अनुभवण्याची अन् गुरुकृपा संपादन करण्याची संधी मिळणार आहे. हे बांंधकाम पूर्ण झाल्यावर तो आश्रमच होणार आहे’, असे विचार माझ्या मनात तीव्रतेने येत होते आणि माझी गुरुमाऊलीच्या चरणी सतत कृतज्ञता व्यक्त होत होती. ‘या माध्यमातून गुरुमाऊली माझ्याकडून साधना करवून घेत आहे’, असे मला जाणवत होते. त्यानंतर मी

प.पू. गुरुमाऊलीला प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, आपणच हे विचार माझ्या मनात घातले. आता तुम्हाला अपेक्षित असे या आश्रमाचे बांधकाम करवून घ्या. हा आश्रम चैतन्याचा स्रोत बनून आम्हा सर्व साधकांची मने जुळून आमच्याकडून साधना करवून घ्या.’

४. वर्ष २०२० मधील दत्तजयंतीच्या शुभमुहूर्तावर भूमीपूजन करून बांधकामाला आरंभ करणे आणि ‘येणार्‍या आपत्काळात इथे रहाणार्‍या सर्व साधकबंधूंचे रक्षण होऊ दे आणि नंतरच्या रामराज्यातही हा आश्रम असाच चैतन्यमय राहू दे’, अशी प्रार्थना करणे

प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने वर्ष २०२० मधील मार्गशीर्ष पौर्णिमेच्या (दत्तजयंतीच्या (२९.१२.२०२०) शुभमुहूर्तावर मी भूमीपूजन करून बांधकामाला आरंभ केला. तेव्हा मी गुरुमाऊलीला प्रार्थना केली, ‘आजपासून ही वास्तू आपला आश्रम आहे. हे शेत आपले आहे. आपणच आमच्याकडून आपत्काळापूर्वी या वास्तूचे काम परिपूर्ण आणि भावपूर्ण करवून घ्या. येणार्‍या आपत्काळात इथे रहाणार्‍या सर्व साधकबंधूंचे रक्षण होऊ दे आणि नंतरच्या रामराज्यातही हा आश्रम असाच चैतन्यमय राहू दे. आम्हा सर्व साधकांकडून त्यानुरूप कृती करवून घ्या.’

– श्री. गुणवंत चंदनखेडे, चंद्रपूर (९.२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक