देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे पालटावीत !  

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय सरकारांनी हे का केले नाही ? हिंदु राष्ट्रात ही नावे सर्वप्रथम पालटली जातील !

महंत नरेंद्र गिरि

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे हटवण्याची मागणी केली आहे. या नावांच्या ऐवजी रस्त्यांच्या देशासाठी प्राणत्याग केलेल्या महापुरुषांची नावे देण्यात यावीत, असे त्यांनी म्हटले आहे.

महंत नरेंद्र गिरि म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातील अनेक रस्त्यांची नावे मोगल आणि इंग्रज यांच्या नावावर आहेत. आक्रमणकर्त्यांची नावे पाहून साधू-संतच नव्हे, तर देशातील युवकांनाही त्रास होतो. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर देशद्रोह करणार्‍यांचीही नावे हटवून हुतात्मा चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल आदी देशभक्तांची नावे ठेवण्यात यावीत.

(म्हणे) ‘सरकारने अशा गोष्टींऐवजी विकासाकडे लक्ष द्यावे ! – समाजवादी पक्ष

मोगलांच्या वंशजांचा पक्ष असल्याप्रमाणे वागणार्‍या समाजवादी पक्षाकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? समाजवादी पक्षाने ‘उत्तरप्रदेशमध्ये त्यांची सत्ता असतांना किती विकास केला’, हे प्रथम सांगावे ! ज्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या अस्मितेची जाणीव नसते, ते नेहमीच गुलामगिरीतच जगतात, हे समाजवादी पक्षाने यातून दाखवून दिले आहे !

सरकारने नाव पालटण्याच्या ऐवजी विकासाकडे लक्ष द्यायला हवे, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे प्रवक्ते विवेक सायलस यांनी महंत नरेंद्र गिरि यांच्या मागणीवर दिली.

(म्हणे) ‘धर्मगुरूंनी अशा मागण्या करू नयेत !’ – काँग्रेस

राज्यघटनेने प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे कुणीही व्यक्ती राष्ट्राच्या संदर्भात मागणी करू शकते. काँग्रेसवाल्यांनी प्रथम राज्यघटनेचा अभ्यास करावा आणि मगच तोंड उघडावे !

काँग्रेसचे प्रवक्ते अशोक सिंह म्हणाले की, देश धर्मगुरूंच्या सांगण्यावरून नाही, तर राज्यघटनेनुसार चालणार आहे. मग ते हिंदु, मुसलमान अथवा अन्य कोणत्याही धर्माचे धर्मगुरु असोत. कोणत्याही धर्मगुरूंनी अशा प्रकारचे विधान अथवा मागण्या करू नयेत.