सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या सत्संगांच्या माध्यमातून साधिकेने अनुभवलेली त्यांची कृपा !

(सद्गुरु) कु. स्वाती खाडये

१. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये सत्संगात देत असलेले दृष्टीकोन

१ अ. ‘साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, यासाठी त्यांना त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांची जाणीव करून देणे : ‘सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या सत्संगाच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी अनेक वेळा संपर्क झाला. मला सद्गुरु स्वातीताईंना जवळून अनुभवता आले. या सत्संगात साधक ‘कोणत्या प्रसंगांत त्यांचे कोणते स्वभावदोष उफाळून आले आणि कोणत्या स्वभावदोषामुळे चूक झाली’, असे सांगू लागल्यावर पुढचा प्रसंग ऐकून घेण्यापूर्वी त्या सांगायच्या, ‘‘तुमच्या लक्षात आले ना ? तुम्ही कोणते स्वभावदोष आणि अहं यांमुळे देवापासून दूर जात आहात.’’ साधक त्यांच्याकडून झालेल्या चुकांचे समर्थन करत असल्यास सद्गुरु स्वातीताई त्यांना जाणीव करून द्यायच्या आणि त्यांना चुकांंच्या मुळाशी जाण्यासाठी साहाय्य करायच्या.

१ आ. गुरुमाऊलीने सांगितल्याप्रमाणे साधकांनी आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायला हवे ! : सद्गुरु स्वातीताईंनी एका गोष्टीची सर्वांना प्रकर्षाने जाणीव करून देतांना सांगितले, ‘‘आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला भरभरून दिले आहे. त्या तुलनेत त्यांनी आपल्याकडून काहीच मागितलेले नाही. त्यांनी आपल्याला स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करायला सांगितले आहे. आपल्याला ते घालवायचे नसल्यास ‘त्यांच्यामुळे आपल्याला काय लाभ झाले ?’, ते सांगूया. त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतो, तरी आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करत नाही.’’ सद्गुरु स्वातीताईंचे हे सूत्र माझ्या अंतर्मनात कोरले गेले आणि ‘माझे काय चुकते ?’, याचे सतत चिंतन होऊ लागले.

२. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या स्वभावदोष निर्मूलन सत्संगामुळे झालेले लाभ 

२ अ. सद्गुरु स्वातीताईंनी दिलेल्या दृष्टीकोनामुळे प्रसंग आणि स्वभावदोष यांच्या मुळाशी जाऊन चिंतन होऊ लागणे : सद्गुरु स्वातीताई प्रसारातील साधकांचा स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेत होत्या. त्या वेळी एका साधिकेने एका उत्तरदायी साधिकेची चूक सांगितली. ती चूक विशेष गंभीर नव्हती, तरी सद्गुरु स्वातीताईंनी त्या साधिकेला योग्य दृष्टीकोन दिला. त्यांनी सांगितले, ‘‘कुणावर अन्याय होणार नाही’, याची आपण काळजी घ्यायची; पण समोरच्या साधकाच्या मनात विचार आला, तर ‘आपण आणखी कुठे न्यून पडतो ?’, या दृष्टीने चिंतन करून देवाचे साहाय्य घ्यायचे.’’ सद्गुरु स्वातीताईंनी दिलेल्या या दृष्टीकोनामुळे माझे प्रसंग आणि स्वभावदोष यांच्या मुळाशी जाऊन चिंतन होऊ लागले.

२ आ. सद्गुरु स्वातीताईंच्या समोर चूक सांगितल्यामुळे ती सुधारण्यासाठी सहजतेने प्रयत्न होणे : एकदा मी सद्गुरु स्वातीताईंना ‘मी भ्रमणभाष वेळेवर भारित करत नाही’, अशी चूक सांगितली. एका साधिकेने ‘मी कपडे कपाटात नीट घडी करून ठेवत नाही’, अशी चूक सांगितली. आम्ही सद्गुरु स्वातीताईंच्या समोर चूक सांगितल्यामुळे ‘आमच्याकडून ती चूक सुधारण्यासाठी आता सहजतेने प्रयत्न होत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

३. सत्संगांमुळे झालेले लाभ

३ अ. ‘विष्णुलीला सत्संगा’त सहभागी होऊ लागल्यावर सद्गुरु स्वातीताईंमुळे स्वतःला आध्यात्मिक लाभ होत असल्याचे लक्षात येणे : सद्गुरु स्वातीताई जिल्ह्यात आल्यावर त्यांचे मार्गदर्शन असायचे; पण मला तेथे जाता येत नव्हते. त्या वेळी मला वाटायचे, ‘मी प्रसारात काहीच सेवा करत नाही, तर काय सांगणार ?’ माझी देवाला सतत प्रार्थना व्हायची, ‘देवा, तुझी निर्गुण भक्ती मला जमत नाही. ‘ती कशी करायची ?’, ते तू मला शिकव.’ नंतर सद्गुरु स्वातीताई घेत असलेला ‘विष्णुलीला’ सत्संग चालू झाला. आता त्याचे १०० भाग झाले आहेत. ‘या सत्संगामुळे मला चैतन्य मिळून आध्यात्मिक लाभ होईल’, असा भाव ठेवून मी या सत्संगांना बसू लागले. त्या वेळी मला पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ होऊ लागला. देवाने सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग देऊन ‘त्याची निर्गुण भक्ती कशी करायची ?’, हे मला शिकवलेे.

३ आ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये अधिवक्ता साधकांसाठी घेत असलेल्या ‘परिवर्तन सत्संगा’मुळे साधनेला दिशा आणि गती मिळणे : कृपाळू गुरुमाऊलींच्या कृपेमुळे सद्गुरु स्वातीताईंनी अधिवक्ता साधकांसाठी ‘परिवर्तन सत्संग’ चालू केला. त्या माध्यमातून त्यांच्या चैतन्याच्या धबधब्यात आम्ही न्हाऊन निघालो. आम्हाला गुरुमाऊलीने सगुण-निर्गुण भक्ती अनुभवायला दिली. आम्हाला स्थुलातून ‘आम्ही पुष्कळ दूर आहोत’, असे वाटत होते; परंतु सद्गुरु स्वातीताईंनी या सत्संगाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना त्यांच्या छत्रछायेखाली ठेवले. त्यामुळे आमच्या साधनेला आणखी दिशा आणि गती मिळाली. त्यासाठी परात्पर गुरुमाऊली आणि सद्गुरु स्वातीताई यांना माझा कोटीशः प्रणाम !’

– अधिवक्त्या प्रीती पाटील, सांगली (१७.९.२०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक