घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याचे थकबाकीदारांना आवाहन
सावंतवाडी – सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी आणि पाणीपट्टी यांची वसुली करण्यात येत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या वतीने पथक नेमण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी घरोघरी जाऊन ही वसुली करत आहेत. शहरातील मालमत्ताधारक आणि नळपाणीपुरवठा जोडणी धारक यांनी घरपट्टी अन् पाणीपट्टी रक्कम पथकातील कर्मचार्यांकडे द्यावी किंवा नगरपरिषदेच्या कार्यालयात येऊन भरावी. ज्यांची घरपट्टी थकित आहे, अशा मालमत्तांना टाळे ठोकण्यास नगरपरिषदेने प्रारंभ केला आहे. २२ मार्चला शहरातील सबनीसवाडा विभागातील ५ मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले. यापुढेही घरपट्टी थकित असलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना टाळे ठोकण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी घरपट्टी आणि पाणीपट्टी भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.