भारताच्या मानचित्रावरील राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेला केक कापणे, हा त्याचा अवमान नाही ! – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – भारताच्या मानचित्राच्या (नकाशाच्या) आकारातील राष्ट्रध्वज आणि मध्ये अशोक चक्र यांची रचना असलेला केक कापणे म्हणजे देशविरोधी कृत्य किंवा राष्ट्राच्या अस्मितेचा अपमान नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘द प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर अ‍ॅक्ट १९७१’च्या अंतर्गत हा देशाच्या सन्मानाचा अपमान ठरू शकत नाही’, असे न्यायालयाने म्हटले. वर्ष २०१३ मध्ये नाताळच्या दिवशी अशा प्रकारचा एक मोठा केक कापण्यात आला होता. जवळपास २ सहस्र ५०० लोकांना तो वाटण्यात आला. या कार्यक्रमाला कोईम्बतूरच्या जिल्हाधिकार्‍यांचीही उपस्थिती होती. तसेच अनेक धार्मिक नेते आणि खासगी संस्थांचे सदस्य या कार्यक्रमासाठी आले होते. याविरोधात डि. सेंथीकुमार यांनी तक्रार केली होती.

कृती मागील एखाद्याचा हेतू लक्षात घेणे महत्त्वाचे !

न्यायालयाने म्हटले की, एका कृतीमागील एखाद्याचा हेतू लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते. त्यांचा देशाच्या अस्मितेचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. एका कार्यक्रमामध्ये केक कापण्यात आल्याने देशाची अस्मिता न्यून होते का ? स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी अनेक जण राष्ट्रध्वज दर्शवणारे कपडे परिधान करतात. त्यांचा देशाचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नसतो.

अती राष्ट्रवाद देशाच्या प्रगतीसाठी आणि भूतकाळासाठी चांगला नाही !

न्यायालयाने पुढे म्हटले की, भारतासारख्या लोकशाही देशामध्ये राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे; मात्र त्याविषयी अतिरेक करणे देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या गौरवशाली भूतकाळाच्या दृष्टीने चांगले नाही. देशभक्ती म्हणजे केवळ झेंडे फडकावणे, घोषणा देणे नाही, तर जो चांगल्या प्रशासनासाठी लढतो किंवा प्रयत्न करतो, ती देशभक्ती आहे. राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक देशभक्तीच्या समानार्थी असू शकत नाही.

देशभक्ती अंतिम आध्यात्मिक साध्य असू शकत नाही !

न्यायालयाने रवींद्रनाथ टागोर यांच्या एका वाक्याचा उल्लेख करत म्हटले, ‘देशभक्ती हे आमचे अंतिम आध्यात्मिक साध्य असू शकत नाही. मला मानवतेचा शोध घ्यायचा आहे. मी हिर्‍याच्या मूल्यामध्ये काचेचा ग्लास विकत घेणार नाही, तसेच मी देशभक्तीला मानवतेच्या वरचढ होऊ देणार नाही.’