मालवण येथे अवैध मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मासेमारांचे बेमुदत साखळी उपोषण चालू

मत्स्य विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषण

मालवण – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात परप्रांतीय यांत्रिक नौकाधारकांकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येत आहे. याच्या विरोधात पारंपरिक मासेमारांनी अनेक वेळा आवाज उठवूनही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने १२ मार्चपासून पारंपरिक मासेमारांनी येथील मत्स्य विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषण चालू केले आहे.

या आंदोलनाची नोंद घेत राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी १३ मार्चला आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले; मात्र तरीही आंदोलनकर्त्यांनी त्यांचे उपोषण चालू ठेवले आहे. भाजपचे माजी खासदार नीलेश राणे, शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही भ्रमणभाषवरून उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितले.

हायस्पीड ट्रॉलर्स

आंदोलनाला राजकीय वळण देऊ नका !

‘प्रकाशझोतात केल्या जाणार्‍या मासेमारीवर कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी मासेमारांचे साखळी उपोषण चालू आहे. यात सहभागी झालेले मासेमार हे विविध राजकीय पक्षांचे असले, तरी प्रथम ते मासेमार आहेत. हे आंदोलन राजकीय पक्षांच्या विरोधात नसून शासनाला जाग आणण्यासाठी आहे. या उपोषणाला पाठिंबा देणार्‍या सर्व राजकीय पक्षांचे आम्ही स्वागत करतो; मात्र या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये’, असे आवाहन अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मिथून मालंडकर यांनी केले आहे.

मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेवर आक्रमण

जिल्ह्यातील अवैध मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मासेमारांचे आंदोलन चालू असतांना १३ मार्चला मध्यरात्री वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथील समुद्रात गस्तीसाठी गेलेल्या मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेवर परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी आक्रमण केल्याचे समजते. पराराज्यातील ३० ते

३५ हायस्पीड ट्रॉलर्स अवैधपणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करत होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.