भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांचे तमिळनाडूतील मंदिरे भक्तांकडे देण्याचे वचन !
मुंबई – कर्नाटक राज्यातील चिक्कमंगळुरू मतदारसंघातील भाजपचे आमदार तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी ‘तमिळनाडू राज्यात भाजपची सत्ता आल्यास सर्व मंदिरे भक्तांना परत करणार’, असे वचन दिले आहे. ‘मंदिरे मुक्त करा !’, या अभियानाला त्यांनी समर्थन दिले आहे. याविषयी त्यांनी ट्वीटही केले आहे. आमदार सी.टी. रवि यांच्या वचनाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करत आहे. यापूर्वी ‘कर्नाटक राज्यात भाजपची सत्ता आल्यास राज्यातील सर्व मंदिरे पुन्हा भक्तांच्या स्वाधीन करण्यात येतील’, असे आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी दिले होते. तसे निवडणूक घोषणापत्रही प्रसिद्ध करण्यात आले होते. कर्नाटकात भाजपची सत्ता आल्यावर सर्वप्रथम गोरक्षणाचा कायदा संमत केला, त्याच प्रकारे आता कर्नाटकातील सर्व मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्याचा निर्णय घेऊन हिंदु भाविकांच्या श्रद्धांचा सन्मान करावा, असे आवाहन करत भाजपशासित अन्य राज्यांतही मंदिर सरकारीकरण रहित करून मंदिरे भक्तांच्या स्वाधीन करावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात विविध राज्यांतील सहस्रो मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांतील देवनिधी लुटण्यात आला, हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्यात आला. मशिदी आणि चर्च यांना वगळून हिंदूंच्या मंदिरांचेच सरकारीकरण करण्यात आले. हा अन्याय दूर करण्याचा आरंभ भाजपाने करावा, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.