पुणे येथील अवैध हज हाऊसचे प्रकरण : हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा कडाडून विरोध !

पुणे येथील अवैध हज हाऊसचे प्रकरण

पुणे, ११ मार्च (वार्ता) – येथील कोंढवा खुर्द येथे ‘अ‍ॅमेनिटी स्पेस’च्या जागेवर ‘सिव्हीक कल्चरल आणि कम्युनिटी सेंटर’ या गोंडस नावाखाली होत असलेल्या अनधिकृत हज हाऊसला समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला आहे. श्री. एकबोटे यांच्या मागणीला आणि त्यांच्या भूमिकेला हिंदु जनजागृती समिती अन् सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनीही पाठिंबा दिला आहे. हज हाऊस पुण्यात होऊ नये, यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यापूर्वीही तीव्र विरोध केला आहे. ‘भविष्यातही अशा प्रकारच्या अनधिकृत प्रस्तावाला कायमस्वरूपी विरोध राहीलच, तसेच बांधकामाला समर्थन देणार्‍या संघटनांवर कारवाई करण्यात यावी’, अशी भूमिका समस्त हिंदू आघाडीचे प्रवक्ते श्री. सौरभ करडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (पुणे येथील कोंढव्यामध्ये ‘आतंकवाद्यांचे स्लीपर सेल’ आहेत, असा केंद्रीय गुप्तचर खात्याने दिलेला अहवाल, तसेच मुंबईतील हज हाऊसमध्ये आतंकवादी सापडले होते, हे सर्वश्रुत आहे. ही वस्तूस्थिती डोळेझाक करण्यासारखी नसून भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? पुण्याच्या सुरक्षिततेचा विचार करता होऊ घातलेल्या हज हाऊसला विरोध होणे यात चुकीचे ते काय ? – संपादक)

या प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे की, ज्यांच्यावर आजपर्यंत विविध गुन्हे नोंद आहेत, अशा संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांनी अनधिकृत बांधकामाला विरोध करणार्‍या, तसेच समाजोपयोगी कार्य करणार्‍या राष्ट्रनिष्ठ संघटना अन् संघटनेच्या अध्यक्षांच्या विरोधात वारंवार खोटे गुन्हे नोंद करणे, हेच मुळात दुर्दैवी आहे.

समस्त हिंदू आघाडीच्या आणि अन्य संघटनांच्या मागण्या

१. वारंवार संभाजी ब्रिगेड, तसेच तत्सम संघटनांनी श्री. एकबोटे यांच्यावर खोटे खटले नोंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांपैकी जवळपास सर्वच खोट्या तक्रारींमधून श्री. एकबोटे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. श्री. मिलिंद एकबोटे यांना अपशब्द वापरणे, त्यांच्यावर आक्रमण करून जिवे मारण्याच्या धमक्या देणे अशा प्रकारेही कायद्यास वेठीस धरण्याचा प्रकार काही संघटनांनी चालू केला आहे. अशा संघटनांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी.

२. विविध लोकोपयोगी कामांमधून समाजाची सेवा करणे, त्यासाठी पुरस्कार प्राप्त होणे अशा व्यक्तीवर राजकीय हेतूने गुन्हे नोंद करणे, तसेच अशा व्यक्तींचे चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ सिद्ध करून त्याचे माध्यमांद्वारे प्रसारित करून मानहानी करणे, असे जे अवैध प्रकार चालू आहेत, त्याला निर्बंध घातले जावेत.

समस्त हिंदू आघाडीच्या भूमिकेला पाठिंबा देणार्‍या संघटना

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, वारकरी संप्रदाय युवा मंच, समस्त वडार समाज, राजे शिवराय प्रतिष्ठान, श्रीकृष्ण मित्रमंडळ, बजरंग दल, मराठा योद्धा प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ते आणि हिंदु जनजागृती समिती

काय आहे प्रकरण ?

‘कोंढवा हे ‘मिनी पाकिस्तान’ आहे. त्याच ठिकाणी पुणे महापालिकेकडून हज हाऊस बांधण्यात येणार आहे. ‘येथे आतंकवाद्यांचा ‘स्लीपर सेल’ आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो’, असे विधान करणार्‍या समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

श्री. मिलिंद एकबोटे

श्री. सुनील घनवट

वारकरी भवनाकडे दुर्लक्ष, तर हज हाऊससाठी मात्र कोट्यवधींचा निधी ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

पुण्यातील कोंढवा हा संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी आतंकवादी पकडलेले आहेत, असा इतिहास आहे. अशा ठिकाणी हज हाऊस बनवण्याची आवश्यकता काय ? पुणे येथील जनता महापालिकेला जो कर भरत आहे, यातून जमा होणारा पैसा विकासकामांसाठी न वापरता एखाद्या धार्मिक कामासाठी वापरला जात असेल, तर हे पूर्णतः अयोग्य आहे. वारकरी भवन बांधण्यात यावे, याकडे दुर्लक्ष होत असून हज हाऊससाठी मात्र कोट्यवधी रुपये दिले जातात, हे काय चालले आहे ? कोंढव्याला होऊ घातलेल्या हज हाऊसला हिंदु जनजागृती समितीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा नेहमीच विरोध राहील. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि समस्त नागरिक यांच्या धार्मिक भावनांचा विचार करून पुणे महानगरपालिकेने घेतलेला हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.