‘प्रँक व्हिडिओ’च्या विरोधात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे तक्रार !

‘यूथ अगेन्स्ट इन्जस्टिस फाऊंडेशन’कडून पुढाकार !

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाने खरेतर स्वत:हून या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे. नेहमी कुणा संघटनांनीच असे अपप्रकार समोर आणल्यावर प्रशासनास जाग येणे, लज्जास्पद !

नवी देहली – महिलांवर लैंगिक अत्याचार करत त्यांचे ‘प्रँक व्हिडिओज’ बनवून ते ‘यू ट्यूब’सारख्या संकेतस्थळांवर प्रसारित करण्याचे प्रकार सध्या सर्रास दिसू लागले आहेत. या माध्यमातून अश्‍लीलता पसरत असून महिलांवरील अत्याचारांत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, हे लक्षात घेऊन ‘यूथ अगेन्स्ट इन्जस्टिस फाऊंडेशन’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेने या विरोधात पुढाकार घेतला आहे. १० मार्च या दिवशी या संघटनेने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांचे याकडे लक्ष वेधले आहे.

ट्विटरद्वारे या संस्थेने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, तसेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना उद्देशून ट्वीट केले आहे. यामुळे हा विषय ऐरणीवर आला असून महिलांवरील अत्याचारांच्या या पैलूला वाचा फोडली गेली आहे.

 (सौजन्य : BIHARI SHAAN)

‘प्रँक व्हिडिओ’ म्हणजे काय ?

‘प्रँक व्हिडिओ’ म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारे वागणे जेणेकरून तेथील लोक दुखावतील, अस्वस्थ होतील अथवा त्यांचा गोंधळ होईल. ‘कुणी तरी आपल्याला ‘लक्ष्य’ करत आहे’ आणि हे संबंधितांच्या लक्षातही येणार नाही, अशा प्रकारे ‘मजा’ म्हणून बनवलेला व्हिडिओ म्हणजे ‘प्रँक व्हिडिओ’ ! महिलांना अयोग्य ठिकाणी हात लावणे, चारचौघात अचानक जाऊन त्यांचे चुंबन घेणे, त्यांना उचलणे, असे संतापजनक प्रकारही या ‘प्रँक व्हिडिओ’च्या माध्यमातून समोर येत आहेत. महिलांनी अशा लैंगिक अत्याचारांवर आक्षेप घेतल्यास ‘हा प्रँक होता’, या गोंडस नावाखाली या निलाजर्‍या कृतींना पाठीशी घातले जाते.