आरोपीपासून रक्षण करण्यासाठी बंदूक बाळगण्याचा परवाना द्या !

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील विनयभंग पीडित तरुणीची मागणी

अशी मागणी करावी लागणे, हे उत्तरप्रदेशातील पोलिसांना लज्जास्पद ! जर पोलीस महिलांची सुरक्षा करण्यास सक्षम नसतील, तर आता महिलांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल !

हाथरस (उत्तरप्रदेश) – येथे तरुणीची छेड काढणार्‍याची तक्रार केल्यावरून आरोपीने तरुणीच्या वडिलांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात आरोपी गौरव शर्मा याला अटक करण्याचा आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला असूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही. यामुळे या तरुणीने तिचे आणि कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी बंदूक बाळगण्याचा परवाना द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

या तरुणीने म्हटले आहे की, घटनेच्या ५ दिवसांनंतरही गौरव शर्मा याला अटक करण्यात आलेली नाही. आमच्यासमवेत काहीही घडू शकते. जिवंत रहाण्यासाठी मला बंदूक आवश्यक आहे. आता मला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे; पण उद्या ही सुरक्षा मागे घेण्यात येईल, तेव्हा काय होईल ? असा प्रश्‍न तिने विचारला आहे.

पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याने वडिलांची झाली हत्या !

या तरुणीने म्हटले की, पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता. मंदिरात गौरव, त्याची पत्नी आणि मावशी यांच्याशी झालेल्या वादावादीनंतर मी स्थानिक पोलिसांना दूरभाष करून गौरवने धमकी दिल्याची माहिती दिली होती. स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता मला ११२ हेल्पलाईनला दूरभाष करण्यास सांगितले. त्यामुळे वादानंतर गौरवने माझ्या वडिलांची गोळ्या झाडून हत्या केली, असा दावा तिने केला. (जर हे सत्य असेल, तर याची चौकशी करून संबंधित पोलिसांना बडतर्फ करावे, तसेच कामात कुचराई केल्याने एका व्यक्तीच्या हत्येला उत्तरदायी ठरवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक)