धार्मिक भावना दुखावल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त
म्हापसा, २ मार्च (वार्ता.) – सोनारखेड, आसगाव येथील साईबाबा घुमटीची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. या प्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार स्थानिकांनी हणजूण पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. ‘आसगाव येथे धार्मिक सलोखा बिघडू देऊ नका. सर्व धर्मांचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने रहातात’, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे. साईबाबा घुमटीच्या ठिकाणी २८ फेब्रुवारी या दिवशी स्थानिकांनी ८ वा वर्धापनदिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व भाविक रात्री १२ वाजता घरी गेल्यानंतर कुणी अज्ञातांनी घुमटीची तोडफोड केली आणि आतील मूर्ती अन् पूजेचे साहित्य आजूबाजूला टाकले. या ठिकाणी दुकाने थाटण्यासाठी काहींनी कोमुनिदादकडे अर्ज केले आहेत. ही जागा विकसित करण्यासाठी काहींनी हे कृत्य केल्याचा स्थानिकांना संशय आहे. मुणांगवाडा, आसगाव येथील ‘श्री क्षेत्र सोनारखेड दत्तात्रय ट्रस्ट’चे पदाधिकारी श्री. विष्णु तयकटकर म्हणाले, ‘‘ही घुमटी काहींच्या डोळ्यांत खुपते. मंदिराचे सौदर्यीकरण कुणीही बिघडवायचा प्रयत्न करू नये. मंदिरापासून १०० मीटर भूमी सोडून इतरत्र ते काही करू शकतात. मंदिराकडे कुणीही असा प्रकार करू नये. धार्मिक सलोखा बिघडायला देऊ नये.’’