बासरी, वीणा, सतार आणि तबला या भारतीय वाद्यांच्या नादांचा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

संगीत आणि नृत्य यांवरील प्रयोगांच्या सूक्ष्माच्या संदर्भातील वार्ता (सूक्ष्म-वार्ता) !

‘या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. ‘ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात’, असा अर्थ होत नाही, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे ‘तो नाही’, असे नाही. साधनेमुळे जिवाची सात्त्विकता वाढू लागते. साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ‘सूक्ष्मातील’ कळू लागते आणि एखाद्या गोष्टीतील चांगली अन् त्रासदायक स्पंदने जाणवू लागतात. सध्या रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. हे समाजाला दाखवून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आम्ही संगीत अन् नृत्य यांवर संशोधनात्मक प्रयोग केले. जे आम्हाला सूक्ष्मातून जाणवले, ते समाजाला पटण्यासाठी आणि ‘योग्य काय असायला हवे ?’, ते त्याला समजण्यासाठी, ते वैज्ञानिक उपकरणांद्वारेही सिद्ध करून दाखवले आहे. येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्‍या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.

कु. तेजल पात्रीकर

‘भारतीय संगीत हे केवळ करमणुकीसाठी नसून ती एक साधना आहे. भारतीय वाद्यांपैकी सर्वच वाद्यांचा संबंध देवतांशी आहे. आपण कोणतेही भारतीय वाद्य पाहिले, तरी आपल्याला त्या वाद्याशी संबंधित देवता आठवते. श्री सरस्वतीदेवीची वीणा, भगवान शिवाचा डमरू, श्रीकृष्णाची बासरी, देवर्षि नारदांची वीणा आदी वाद्ये सर्वपरिचित आहेत. वादनात व्यंजने नसून ईश्‍वराच्या निर्गुण तत्त्वाच्या अधिक जवळ असणारे केवळ स्वरच असतात. त्यामुळे भारतीय वाद्यांच्या वादनाच्या माध्यमातून साधना करत असलेल्या जिवाला, तसेच ते स्वर ऐकणार्‍यालाही त्या त्या वाद्यातून संबंधित देवतेच्या तत्त्वाची अनुभूती घेता येते. भारतीय वाद्यांचे बोल आणि सूर ऐकतांना होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ३.९.२०१७ ते ८.९.२०१७ या कालावधीत सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसमोर सतार, बासरी, तबला आणि वीणा यांचे वादन सादर करण्यात आले. त्या वेळी लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत. 

१. सतारवादनाच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूूर्ण सूत्रे

३.९.२०१७ या दिवशी सांगली येथील श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी सतारवादन केले.

१ अ. अनिष्ट शक्तींनी ध्यानाच्या माध्यमातून सतारीच्या सुरांशी लढणे : सतारवादनाच्या वेळी उपस्थित असलेल्या जवळजवळ सर्वच साधकांचे ध्यान लागले होते. एका साधिकेचे सतारवादनावर नृत्य करता करता ध्यान लागले, तर अन्य एका साधकाचे अभिनय सादर करतांना ध्यान लागले. वरवर पहाता ‘सर्व साधकांचे ध्यान लागले आहे’, असे वाटत होते; पण प्रत्यक्षात सतारीच्या सात्त्विक वादनाने त्या साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींनी साधकांचे ध्यान लावले आणि त्या माध्यमातून सतारीच्या सुरांशी त्या सूक्ष्मातून लढत होत्या.

१ आ. दोन साधिका नृत्य करत होत्या. त्या वेळी त्यांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींनी त्या साधिकांचा तोंडवळा अत्यंत मोहक दिसेल, असा केला होता.

१ इ. अनिष्ट शक्तीने प्रतिनाद निर्माण करून सतारीच्या सात्त्विक नादाशी लढणे : एका साधिकेला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला सतारीच्या स्वरांचा पुष्कळ त्रास होत असल्याने तिने आसंदीवर तबल्याप्रमाणे हात वाजवून आसंदी वाजवायला आरंभ केला. अनिष्ट शक्ती अशा प्रकारे प्रतिनाद निर्माण करून सतारीच्या सात्त्विक नादाशी लढत होती.

१ ई. सतारीचे सात्त्विक सूर सहन न झाल्याने सतारवादनाच्या शेवटी त्रास असलेले सर्व साधक झोपले होते. (साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींनी झोपल्याचे नाटक केले.)

२. बासरीवादनाच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूूर्ण सूत्रे

६.९.२०१७ या दिवशी पुणे येथील सनातनचे साधक श्री. निखिल आठवले यांचे बासरीवादन झाले.

२ अ. बासरीच्या सात्त्विक नादामुळे साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींनी सूक्ष्मातून लढणे : वाद्यांच्या स्वरांच्या माध्यमातून देहभान हरपून नादब्रह्माची उच्च स्तरावरील अनुभूती येण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे बासरीवादन होय. तबलावादनाच्या वेळी तीव्र त्रास असलेल्या साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींचा त्रास वाढला होता. भगवान श्रीकृष्णाचे प्रतीक असलेल्या बासरीच्या सात्त्विक नादामुळे या वेळी मात्र त्या केवळ सूक्ष्मातून लढल्या.

२ आ. बासरीवादन ऐकू न देणे

१. बासरीवादनास आरंभ झाल्यावर काही कालावधीनंतर त्रास असलेले साधक एकमेकांशी अनावश्यक बोलू लागले. (गप्पा मारू लागले.)

२. अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या एका साधिकेला बराच वेळ बासरीचे सूर ऐकूच येत नव्हते. त्या वेळी तिला अन्य आवाज ऐकू येत होते. (तिला त्रास देणारी अनिष्ट शक्ती तिला बासरीचे सूर ऐकूच देत नव्हती.) अशा प्रकारे ‘बासरीवादन ऐकू न देण्याचे हे अनिष्ट शक्तींचेच नियोजन होते’, हे लक्षात आले.

२ इ. एका साधिकेने श्रीकृष्णलीलेतील ‘कालियामर्दन’ या प्रसंगावर आधारित नृत्य सादर करतांना कालियानागाचा अभिनय अधिक वेळ करून त्याचेच उदात्तीकरण करणे : अनिष्ट शक्तींचा त्रास असलेल्या आणि ‘कथ्थक’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकलेल्या एका साधिकेने श्रीकृष्णलीलेतील ‘कालियामर्दन’ या प्रसंगावर आधारित नृत्य सादर केले. त्या वेळी तिने श्रीकृष्णाचा अभिनय अधिक वेळ न करता कालियानागाचा अभिनय अधिक वेळ करून त्याचेच उदात्तीकरण केले. यापूर्वीही तिचा त्रास वाढलेला असतांना तिला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीने नागाच्याच हालचाली केल्या होत्या.

३. तबलावादनाच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूूर्ण सूत्रे

७.९.२०१७ या दिवशी गोवा येथील सनातनचे साधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी तबलावादन केले.

तबलावादन करतांना श्री. गिरीजय प्रभुदेसाई

३ अ. तबल्याच्या नादात सात्त्विकता असल्यामुळे ‘भरतनाट्यम्’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकलेली एक साधिका नृत्य करण्यासाठी उभी राहिल्यावर तिला गुंगी आल्याप्रमाणे होणे : तबल्याच्या नादाला विशिष्ट ताल, तसेच विशिष्ट लय असल्यामुळे त्या नादात सात्त्विकता असते. तबलावादन चालू झाल्यावर ‘भरतनाट्यम्’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकलेली एक साधिका नृत्य करण्यासाठी बराच वेळ उभी होती. त्यानंतर तिला गुंगी आल्याप्रमाणे होऊन तिने डोळे बंद केले. तबल्याच्या सात्त्विक नादाने त्या साधिकेला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीचा त्रास वाढून ती साधिका डोळे बंद असलेल्या स्थितीत (ध्यानावस्थेत) भूमीवर पायांनी आघात करत होती. तबल्याच्या नादाला प्रतिनाद करत असतांना तिच्या पायांचे आघात तबल्याच्या बोलांनुसार होत होते. प्रत्यक्षात ही साधिका ‘भरतनाट्यम्’ शिकलेली असल्याने तिला तबल्याच्या साथीने नृत्य करणे सहज जमत नाही. त्या वेळी त्या साधिकेची चिडचिड वाढली होती.

३ आ. तबल्याच्या सात्त्विक नादाच्या विरुद्ध बालदी, डबे आणि आसंदी वाजवून काढलेले विविध नाद हे तामसिक असल्याचे लक्षात येणे : तबल्याच्या सात्त्विक नादामुळे तीव्र त्रास असलेल्या साधकांचा अनिष्ट शक्तींचा त्रास वाढला होता. यानंतर त्यांना देण्यात आलेल्या रिकाम्या बालद्या आणि डबे वाजवायला आरंभ केला. त्यांनी आसंद्यांवर (खुर्च्यांवर) हात वाजवून आसंद्यांतून, तसेच डबे आणि बालद्या वाजवून काढलेल्या नादाला ताल आणि लय नव्हती. तो केवळ गोंगाट होता. त्या वेळी ‘तबल्याच्या सात्त्विक नादाच्या विरुद्ध बालदी, डबे आणि आसंदी (खुर्ची) यांतून काढलेले विविध नाद तामसिक असून हे सूक्ष्मातून नादयुद्ध चालू आहे’, असे लक्षात आले.

४. वीणावादनाच्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूूर्ण सूत्रे

८.९.२०१७ या दिवशी चेन्नई येथील सनातनच्या साधिका सौ. उमा रविचंद्रन् (आताच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन्) यांनी वीणावादन केले.

वीणावादन करतांना पू. (सौ.) उमा रविचंद्रन्

४ अ. वीणावादन अधिक सात्त्विक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक परिणामकारक असणे अन् त्याची नामजपादी उपाय करण्याची क्षमताही अधिक असणे : आतापर्यंत सादर झालेल्या सर्व वादनांच्या तुलनेत वीणावादन अधिक सात्त्विक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक परिणामकारक होते, तसेच त्याची नामजपादी उपाय करण्याची क्षमताही अधिक होती. वीणावादनाच्या प्रारंभापासूनच अनिष्ट शक्तींचा त्रास असलेले सर्व साधक शांत बसून होते.

‘साधकांना त्रास देणार्‍या सर्व अनिष्ट शक्ती शक्तीहीन झाल्या असाव्यात ’, असे वाटत होते. त्यांना वीणेवरील एका रागाच्या वादनानंतर लगेचच असात्त्विक बॉलीवूड आणि पाश्‍चात्त्य गाण्यांच्या चालीवर वाजवलेल्या वीणेची ध्वनीचकती ऐकवण्यात आली. त्या वेळी मात्र त्रास असलेल्या काही साधकांनी उठून नृत्य केले. वीणावादन अधिक परिणामकारक असल्याने साधकांना त्रास देणार्‍या अनिष्ट शक्ती आरंभी शांत होत्या; मात्र नंतर त्यांनी असात्त्विक गाण्यांमधून त्रासदायक शक्ती मिळवली आणि नंतर वीणेच्या स्वरांशी एकेकट्याने न लढता सामूहिकरित्या नृत्य करून सूक्ष्म युद्ध केले.

४ आ. वीणेतून निघणार्‍या स्वरांचा नाद हा सात्त्विक असल्याने त्रास असलेल्या एका साधिकेला एका असात्त्विक गाण्याच्या चालीवर वाजवलेल्या वीणेच्या स्वरांवरही नृत्य करण्यासाठी उठता आले नाही.’

– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.११.२०१७)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक