‘मला सद्गुरु स्वाती खाडये यांचा सत्संग लाभतो. त्यांच्या सत्संगात मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. अन्य महत्त्वाच्या सेवा असूनही सेवाकेंद्रातील अडचणी सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे
‘कोल्हापूर सेवाकेंद्रात काही पूर्णवेळ साधकांचे नियोजन करणे आवश्यक होते. तेव्हा सद्गुरु स्वातीताईंनी अनेक जिल्ह्यांमधील साधकांना सेवाकेंद्रात सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्या ‘सेवाकेंद्रातील साधकांना आवश्यक गोष्टींची उणीव भासू नये’, याची काळजी घेतात. त्या ‘सेवाकेंद्रात लागणारे साहित्य कुठे अर्पणात मिळू शकते का ?’, हे पहातात. त्या अन्य सेवांमध्ये व्यस्त असूनही सेवाकेंद्रातील अडचणी सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करतात. सद्गुरु स्वातीताईंचे कोल्हापूर सेवाकेंद्रातील आणि प्रसारातील सर्व साधकांकडे बारकाईने लक्ष असते. सद्गुरु स्वातीताई सेवाकेंद्रात आल्यावर साधकांमध्ये उत्साह निर्माण होतो.
२. वेळप्रसंगी साधकांसाठी प्रेमाने महाप्रसाद बनवणे
सेवाकेंद्रात कधी कधी स्वयंपाक बनवण्यासाठी अल्प साधकसंख्या असते. तेव्हा सद्गुरु स्वातीताई साधकांसाठी प्रेमाने महाप्रसाद बनवतात. त्यांनी बनवलेल्या अन्नपदार्थांना अवीट गोडी असते. त्या महाप्रसाद बनवत असतांना ‘साक्षात् अन्नपूर्णादेवी महाप्रसाद बनवत आहे’, असे मला वाटते. तेव्हा माझी भावजागृती होऊन माझ्या शरिरावर रोमांच येतात.

३. साधकांच्या अडचणी प्राधान्याने सोडवणे आणि ‘सांगितलेल्या उपाययोजनांनुसार साधकांकडून कृती होत आहे ना ?’, याचा आढावा घेणे
सद्गुरु स्वातीताई कुठलेही सूत्र प्रलंबित ठेवत नाहीत. त्या सत्संग घेत असतांनाही त्यांची भ्रमणभाषवरून समन्वयाची सेवा चालू असते. साधकांनी त्यांना अडचण सांगितली, तर त्या विविध उपाययोजनांचा अभ्यास करून समोरच्या साधकाची अडचण तत्परतेने सोडवतात आणि ‘तो साधक सांगितलेल्या सूत्रांनुसार कृती करत आहे ना ?’, याचा आढावाही घेतात.
४. साधनेचे चांगले प्रयत्न करणार्या साधकांना प्रसाद देऊन प्रोत्साहन देणे
सद्गुरु स्वातीताई उत्तरदायी साधकांकडून प्रसारातील साधकांचे प्रयत्न समजून घेतात. त्या पुष्कळ तळमळीने आणि चांगले प्रयत्न करणार्या साधकांना आवर्जून प्रसाद देतात. सद्गुरु स्वातीताईंकडून मिळालेल्या प्रसादामुळे साधकांचा उत्साह द्विगुणित होतो आणि साधक अधिक उत्साहाने सेवा करतात.
५. ‘सद्गुरु स्वातीताईंची कांती अत्यंत तेजस्वी आणि सोनेरी वर्णाची झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा मला वाटले, ‘त्यांच्या कांतीमध्ये झालेले पालट, म्हणजे येणार्या आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी भगवंताने केलेली पूर्वसिद्धता आहे.’
६. अनुभूती
६ अ. सद्गुरु स्वाती खाडये घरी येऊन गेल्यानंतर साधनेच्या प्रयत्नांत वृद्धी होऊन सातत्य येणे : माझ्यावर आलेल्या कठीण परिस्थितीत मला सद्गुरु स्वातीताईंचा मोठा आधार मिळाला आणि आम्ही त्या कठीण परिस्थितीतून सहजतेने बाहेर पडलो. माझे यजमान रुग्णाईत असतांना सद्गुरु स्वातीताईंनी तत्परतेने आम्हाला काही नामजपादी उपाय करायला सांगितले. त्या माझ्या यजमानांना भेटायला आल्या. तेव्हा ‘त्यांच्या रूपाने साक्षात् गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आमच्या घरी आले आहेत’, असे आम्हाला वाटले. सद्गुरु स्वातीताई घरी येऊन गेल्यापासून आमच्या साधनेमध्ये वृद्धी होऊन आमच्या साधनेच्या प्रयत्नांत सातत्य आले.
६ आ. सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणांना मर्दन करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती : सद्गुरु स्वातीताई कोल्हापूर सेवाकेंद्रात असतांना त्यांच्या चरणांना मर्दन करण्याची संधी मला आणि एका साधिकेला मिळते.
१. मला ‘त्यांची सेवा करण्याची संधी मिळणार आहे’, असे समजल्यावरही मला चैतन्य मिळते. त्या वेळी ‘माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मी अनेक वेळा अनुभवले आहे.
२. आम्ही प्रार्थना करून त्यांच्या चरणांना मर्दन करत असतांना आम्हाला त्यांच्या चरणांवर चंदेरी, सोनेरी, तसेच वेगवेगळ्या रंगांचे दैवी कण दिसतात. आम्हाला त्यांचे चरण मऊ लागतात.
७. कृतज्ञता
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु स्वातीताई, आपल्याच अपार कृपेमुळे या पामर साधिकेला सद्गुरूंचा अमूल्य सहवास लाभत आहे. आमच्या अनेक जन्मांची पुण्याई आहे; म्हणून आम्हाला सद्गुरूंची सेवा करण्याची संधी लाभत आहे. ‘गुरुदेवा, ‘या सेवेतून माझ्यामधील स्वभावदोषांचे परिमार्जन होऊन माझ्यामध्ये गुणांची वृद्धी होऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. मेघमाला जोशी, कोल्हापूर (१३.३.२०२५)
|