साधनेमुळे स्वतःमध्ये झालेले सकारात्मक पालट अनुभवणार्‍या गोवा येथील अधिवक्त्या (सौ.) पूजा सुनील शिरसाट !

सौ. पूजा शिरसाट उच्चशिक्षित आणि आधुनिक विचारांच्या असूनही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींच्या कृपेमुळे त्यांच्यात पुढील पालट झाले. 

सौ. पूजा शिरसाट

१. कुंकू लावण्याचे महत्त्व कळल्यावर नियमित टिकली लावणे 

‘पूर्वी माझे वडील आणि सासूबाई मला नेहमी ‘कपाळाला टिकली लाव’, असे सांगायचे. तेव्हा मला वाटायचे, ‘ही वडीलधारी माणसे किती जुन्या विचारांची आहेत !’; म्हणून मी केवळ सण उत्सवालाच कपाळावर टिकली लावायचे. मी प्रतिदिन टिकली लावत नव्हते; परंतु आता साधनेत आल्यापासून मला कूंकू लावण्याचे महत्त्व कळले आणि मी आता प्रतिदिन टिकली लावते. टिकली लावण्यामुळे माझा आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटतो. (‘प्रतिदिन कुंकू लावल्यामुळे अधिकाधिक सकारात्मक पालट जाणवतात.’ – संकलक)

२. गुरुदेवांच्या कृपेने घरातील सर्वांचा मांसाहार बंद होणे 

पूर्वी आमच्या घरी सर्वजण आठवड्यातून २ – ३ वेळा मांसाहार करायचे; पण आता प.पू. गुरुदेवांच्या कृपेने घरातील सर्वांनी मांसाहार करणे बंद केले आहे. गेल्या दीड वर्षापासून मुलांनीही मांसाहार करणे बंद केले आहे. खरेच ही गुरुमाऊलींचीच कृपा आहे ! त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.

३. गोमूत्राचे महत्त्व कळल्यावर प्रतिदिन गोमूत्राचे थेंब टाकलेल्या पाण्याने स्नान करणे 

माझे लग्न झाल्यावर मासिक पाळीच्या दिवसांत सासूबाई मला ‘स्नान करतांना पाण्यात गोमूत्र घालण्यास सांगत.’ तेव्हा सासूबाईंबद्दलही ‘या किती जुन्या विचारांच्या आहेत !’, अशी मला प्रतिक्रिया यायची आणि मी गोमूत्र वापरायचे नाही; परंतु साधनेत आल्यावर मला एका साधिकेकडून गोमूत्राचे महत्त्व कळले. अंघोळ करतांना गोमूत्राचे थेंब टाकलेल्या पाण्याने स्नान केल्यामुळे होणारे लाभ समजले. तेव्हापासून मी प्रतिदिन स्नान करतांना आधी गोमूत्राच्या पाण्याने स्नान करते. मला आता त्याविना स्नान केल्यासारखे वाटतच नाही.

४. साधनेमुळे सात्त्विक भारतीय पोषाख  घातल्याने सुरक्षित आणि प्रसन्न वाटणे 

पूर्वी मी पुष्कळ आधुनिक पद्धतीचे (‘फॅन्सी’) कपडे घालायचे. ‘जीन्स पँट’, बिनबाह्यांचे (‘स्लीव्हलेस’) कपडे घालायचे. आता मला असे कपडे मुळीच घालावेसे वाटत नाहीत. आता मला ‘साधा सलवार-कुडता, साडी, असा सात्त्विक भारतीय पोषाखच घालावा’, असे वाटते. या कपड्यांमध्ये मला सुरक्षित आणि प्रसन्न वाटते.

५. ‘राग येणे’ या दोषावर मात करता येणे

पूर्वी मला पुष्कळ राग यायचा. छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही माझी चिडचिड व्हायची. ‘आता माझे राग येण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे’, असे माझे यजमानही सांगतात. खरेतर, हे सर्व अशक्यच होते; परंतु प.पू. गुरुदेवांची कृपा अगाध आहे. त्यांनी अशक्य ते शक्य केले.

‘प.पू. गुरुदेव, माझ्यातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट करावी आणि माझ्यामध्ये सकारात्मक शक्ती कार्यान्वित करावी. मला साधनेत पुढे पुढे घेऊन जावे’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे. माझ्यात हे पालट घडवून आणल्याविषयी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते.’

– अधिवक्त्या (सौ.) पूजा सुनील शिरसाट, म्हापसा, गोवा. (३०.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक