मुख्यमंत्र्यांनी वीजजोडणी तोडण्याच्या आदेशाला तात्काळ स्थगिती द्यावी ! – चंद्रशेखर बावनकुळे, नेते, भाजप

भाजपचे वाढीव वीजदेयकाच्या विरोधातील आंदोलन स्थगित

चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर – येत्या २४ फेब्रुवारीपासून भाजपच्या वतीने भरमसाठ वीजदेयक वाढीच्या सूत्रांवरून ‘कारागृह भरा’ आंदोलन केले जाणार होते; मात्र राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारी या दिवशी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही हे आंदोलन स्थगित केले आहे, अशी माहिती भाजपचे नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी येथे दिली. ज्याप्रमाणे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने उत्तरदायी विरोधक म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे, त्याच पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ वीजजोडणी खंडित करण्याच्या निर्णयालाही स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

बावनकुळे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एका बैठकीचे नियोजन करून ‘दळणवळण बंदी’च्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीजदेयक माफ करावे, सरासरी वीजदेयकात दुरुस्ती करावी, १२ बलुतेदारांचे कोरोनाकाळातील वीजदेयक माफ करू, यांसह ज्या घोषणा केल्या आहेत, त्यांची कार्यवाही तात्काळ करावी. वीजजोडणी तोडण्याची मोहीम चालू करून सरकारने हा निर्णय शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याकडे घेऊन जाणारा ठरणार असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांवर सकारात्मकतेने विचार करावा, अन्यथा कोरोनाचा संसर्ग अल्प होताच भाजपद्वारे पुन्हा या विषयावरून आंदोलन छेडले जाईल.