भारतातील परिवहन सेवेचा चेहरामोहरा पालटण्याचे श्रेय अभियंता ई. श्रीधरन् यांना जाते. देशातील सर्वांत आव्हानात्मक ठरलेली रेल्वे म्हणून ओळखल्या जाणार्या कोकण रेल्वेचे दायित्व ई. श्रीधरन् यांनी कुशलतेने पार पाडले. इंग्रजांनाही जे जमले नव्हते, ते श्रीधरन् यांनी पूर्ण केले. इतकेच नव्हे, तर कोलकात्यातील मेट्रो रेल्वेही त्यांनी पूर्ण केली. देहलीतील मेट्रोचे जाळे आपण आज पहात आहोत, ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे संपूर्ण श्रेय ई. श्रीधरन् यांना जाते. यानंतर देशातील अन्य राज्यांतील शहरांतही मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. याचा पाया श्रीधरन् यांनीच घातला आहे. वर्ष १९६३ मध्ये रामेश्वरम् आणि तमिळनाडू यांना जोडणारा रेल्वेचा पम्बन पूल तुटला होता. रेल्वेने तो दुरुस्त करण्यासाठी ६ मासांचे लक्ष्य ठरवले होते, तर तेथील प्रमुखाने त्यासाठी ३ मासांचा अवधी दिला होता; मात्र श्रीधरन् यांना हे काम दिल्यावर त्यांनी अवघ्या ४५ दिवसांत पूल दुरुस्त करून दाखवला. वर्ष २००३ मध्ये प्रसिद्ध ‘टाइम’ नियतकालिकाने श्रीधरन् यांना ‘आशियाचा हिरो’ घोषित केले होते. श्रीधरन् यांचे वैशिष्ट्य म्हणजे निर्धारित वेळेत काम पूर्ण करणे. भारतामध्ये सरकारी पातळीवर कोणतेही काम कधीही निर्धारित वेळेत पूर्ण होत नाही, तेथे श्रीधरन् यांच्यासारखे अधिकारी ते करून दाखवतात, हा एकमेवच अपवाद म्हणावा लागेल. त्यांच्याकडून हा गुण भारतातील प्रत्येक नागरिकाने घेण्याची आवश्यकता आहे. दिलेले काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन, त्यातील अडथळे दूर करणे आदींचा अभ्यास आणि ते प्रत्यक्षात कृतीत आणणे, यासाठी फार मोठे कौशल्य लागते, ते श्रीधरन् यांच्यामध्ये ठासून भरल्यानेच ते हे कार्य लीलया पार पाडू शकले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण सन्मान देण्यात आला आहे. सध्या ८८ वर्षांचे असलेले श्रीधरन् राजकारणात येऊ इच्छित आहेत, ही भारतियांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. इतक्या उशिरा राजकारणात येण्याचा प्रयत्न कुणी क्वचित्च करतो. श्रीधरन् यांनी तो केला आहे. यामागे निश्चित त्यांची काही योजना असणार आणि त्यानुसार त्यांनी असे पाऊल उचलले असणार यात शंका नाही. यातही ते निश्चितपणे यशस्वी होतील, अशी अपेक्षा करायला त्यांचा इतिहास पहाता हरकत नसावी. श्रीधरन् भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जगजाहीर झाले आहे आणि त्यांनीही याला दुजोरा दिलेला आहे. आता केवळ भाजपप्रवेशाची औपचारिकता उरली आहे. भारतीय राजकारणात श्रीधरन् यांच्यासारख्या गुणांचा समुच्चय असलेल्या व्यक्तीची पुष्कळ आवश्यकता आहे. भारतियांचे दुर्दैव असे की, त्यांनी कधी उच्चशिक्षित झाल्यावर राजकारणात प्रवेश करून त्याद्वारे भारताचा विकास करण्याचा विचार केला नाही. गुंड प्रवृत्तीचे, अशिक्षित किंवा अल्पशिक्षित, चारित्र्यहीन, भ्रष्टाचारी लोकांचाच भारतीय राजकारणात बोलबाला राहिल्याने देशाची अतोनात हानी झाली आहे. अजूनही भारतियांची तीच मानसिकता राहिली आहे. त्यातही केवळ उच्चशिक्षित असून उपयोग नाही, तर तो देशासाठी प्रामाणिकपणे गतीशील कार्य करणारा हवा अन्यथा आज देशात उच्चशिक्षितांची राजकारणात कमतरता नाही; मात्र त्यातील किती जणांमध्ये श्रीधरन् यांच्यासारखे गुण आहेत आणि किती जण पक्के राजकारणी आहेत, हे वेगळे सांगायला नको.
हिंदुत्व आणि विकास यांची आवश्यकता !
केरळमध्ये श्रीधरन् यांना भाजपने मोकळेपणाने काम करण्याची मुभा दिलीच, तर ते राजकारणाचे शुद्धीकरण करून विकासासाठी बरेच काही करू शकतील. ८८ व्या वर्षीही त्यांच्या बोलण्यातील जिद्द दिसून आली. ते म्हणाले, ‘‘राजकारणात येऊन राज्यपाल होण्याची मला इच्छा नाही, तर मला मुख्यमंत्री व्हावेसे वाटते.’’ श्रीधरन् यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसेच आहे. राज्यपाल होऊन रबर स्टॅम्प झाल्याने श्रीधरन् यांचा लौकीक उलट अल्प होऊ शकतो. त्यापेक्षा मुख्यमंत्री होऊन ते केरळचा कायापालट आणि तेही ठरवलेल्या मुदतीत करण्याचा प्रयत्न करू शकतात. यासाठी केरळच्या जनतेने त्यांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याची आवश्यकता आहे. केरळच्या जनतेने आतापर्यंत काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची सत्ता पाहिली आहे. आता त्यांनी श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार पहावे, असे देशहितासाठी वाटते. श्रीधरन् म्हणजे ‘नामही काफी है !’ असे म्हणता येईल. श्रीधरन् यांनी हिंदुत्वाचाही विचार अंगीकारल्याचे त्यांच्या ‘लव्ह जिहाद’विरोधी भूमिकेतून स्पष्ट झाले आहे. केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’चे संकट फार मोठे आहे आणि ते हिंदु अन् ख्रिस्ती यांनी मोठ्या प्रमाणात अनुभवले आहे. केरळी जनतेला पर्याय उपलब्ध नसल्याने माकप किंवा काँग्रेस यांच्या भोवतीच सत्ता फिरत राहिली आहे. त्याला मुसलमानांची लोकसंख्याही कारणीभूत आहे. भाजपचे अस्तित्वही फार नसल्याने ही स्थिती आहे; मात्र आता श्रीधरन् यांनी करिष्मा करावा यासाठी जनतेने त्यांना साथ दिली पाहिजे. त्यांचे वय जरी ८८ वर्षे असले, तरी त्यांच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती दिसत आहे. त्याचा लाभ घेतला गेला पाहिजे. येत्या मेमध्ये केरळ येथे निवडणुका होणार आहेत. पुढील २-३ मासांमध्ये भाजपला पुष्कळ कार्य करावे लागणार आहे. बंगाल आणि केरळ या दोन राज्यांतील हिंदूंची दयनीय स्थिती पहाता आणि धर्मांधांचा अत्याचार पहाता येथील सत्ता पालटणे हिंदूंसाठी आवश्यक ठरले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा धोका पहाता हे केरळमध्ये तरी आवश्यकच आहे. पी.एफ्.आय.ने मोपला हत्याकांडाची शताब्दी साजरी करून हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळले आहे. पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची गेले काही वर्षे मागणी होत असतांना पूर्वीच्या काँग्रेस सरकारने टाळाटाळ केली; मात्र आताच्या भाजपने ते करून ‘हिंदूंसाठी खरेच काही करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, याचा विश्वास केरळमधील हिंदूंमध्ये तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण करावा. याचा लाभ निवडणुकीत मिळेल कि नाही, याचा विचार न करता ते केले पाहिजे. केरळमध्ये पुनःपुन्हा मुसलमानांसाठी स्वतंत्र मुसलमानबहुल ‘मलबार’ राज्य निर्माण करण्याचीही मागणी केली जात आहे. हे रोखण्याची आवश्यकता आहे; कारण जशी भारताच्या फाळणीची अनेक वर्षांपासून मुसलमानांची मागणी होती आणि शेवटी त्यांनी ती लाखो हिंदूंची हत्या करून पूर्णत्वाला नेली, ती स्थिती येथे येऊ नये. त्यासाठी केरळमध्ये सत्तापरिवर्तन होणे आवश्यक आहे. भाजपने श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातही प्रत्येक आश्वासन सत्ता आल्यास किती दिवसांत पूर्ण केले जाईल, हेही दिनांकानुसार घोषित केले जावे, असे वाटते. मुख्यमंत्री झाल्यास श्रीधरन् त्या दृष्टीने प्रयत्न करतील, याची शंका वाटत नाही.