पंढरपूर – येथील चैत्र यात्रेचा कालावधी २ ते १२ एप्रिल असा आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे चैत्र यात्रेच्या कालावधीत म्हणजे ७ ते ९ एप्रिल या काळात पंढरपूर शहरातील मांसविक्री, मासे विक्री आणि प्राणी कत्तल, तसेच मांसजन्य पदार्थ विक्री यांवर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत. (प्रशासनाने काढलेले आदेश स्तुत्यच असून खरेतर पंढरपूर-आळंदी अशा तीर्थक्षेत्री वर्षभरच मांसविक्रीस मनाई असणे अपेक्षित आहे ! – संपादक)
मंदिर परिसरात नारळ फोडण्यास आणि विक्री करण्यास मनाई !
चैत्र यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीच्या दर्शनासाठी येणारे वारकरी आणि भाविक यांच्याकडून नामदेव पायरी, तसेच मंदिर परिसरात नारळ फोडण्याने नारळाचे पाणी रस्त्यावर येऊन चिखल होण्याची शक्यता आहे. याच समवेत विक्रेत्यांनी रस्त्यावर टाकलेल्या नारळाच्या सालीमुळे केसरास आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात ‘भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३’चे कलम १६३ अन्वये ७ ते ९ एप्रिल या कालावधीत नारळ फोडण्यास आणि विक्री करण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत.