काश्मीरमध्ये २ चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार, तर एक अधिकारी हुतात्मा

श्रीनगर येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात २ पोलीस हुतात्मा

एकेका आतंकवाद्याला ठार करून काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही, तर त्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट केल्यावरच तो नष्ट होईल !

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथे लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांसमवेत रात्रभर झालेल्या चकमकीनंतर सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले, तर बडगाम येथील चकमकीत एक पोलीस अधिकारी हुतात्मा झाला. ठार झालेल्या आतंकवाद्यांकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. श्रीनगरच्या बाराजुला येथे आतंकवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या गोळीबारात २ पोलीस हुतात्मा झाले. या घटनेनंतर पोलिसांनी या भागाला वेढा घालून शोधमोहीम चालू केली आहे. या गोळीबाराचे सीसीटीव्ही चित्रणही समोर आले आहे. त्या आधारे आतंकवाद्यांचा शोध घेतला जात आहे.

हिंदूंना पुन्हा घाबरवण्याचा प्रयत्न !

जिहादी आतंकवाद्यांनी २ दिवसांपूर्वी श्रीनगरच्या डलगेट येथील कृष्णा ढाब्यावर गोळीबार केला होता, तर १९ फेब्रुवारीला श्रीनगरच्याच बारजुला भागात शिव शक्ती मिष्ठान भंडारला लक्ष्य करत गोळीबार करण्यात आला. (काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर हिंदूंचे पुनर्वसन होईल, असे म्हटले जात होते; मात्र या घटनांतून हिंदू काश्मीरमध्ये अद्यापही असुरक्षितच आहेत, हे परत स्पष्ट झाले आहे. ही स्थिती कायमची पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही ! – संपादक)