जत (जिल्हा सांगली) येथील गुड्डापूरच्या श्री दान्नमादेवी देवस्थानच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा नोंद करण्याचे न्यायालयाचे आदेश

जत (जिल्हा सांगली) येथील गुड्डापूरचे श्री दान्नमादेवी देवस्थान

जत (जिल्हा सांगली) – कर्नाटक आणि महाराष्ट्र येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध श्री दान्नमादेवी देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळाकडून गेल्या १० ते १५ वर्षांपासून विविध कामांत १५ कोटी रुपयांचा अपव्यवहार झाला असल्याची तक्रार बसवंत्ताप्पा चन्नाप्पा पुजारी यांनी न्यायालयात प्रविष्ट केली होती. स्थानिक न्यायालयाने ही तक्रार प्रविष्ट करून घेत जत पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे नोंद करून चौकशी करावी, असा आदेश दिला आहे.

१. प्रारंभी बसवंत्ताप्पा चन्नाप्पा पुजारी यांनी याविषयी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली होती. याची नोंद न घेतल्याने पुजारी यांनी न्यायालयात श्री दान्नमादेवी देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाश शिवाप्पा गणी यांच्यासह चंद्रशेखर रेवप्पा गोब्बी, बाळासाहेब गाडवे, विश्‍वनाथ शिवाप्पा गणी, सदाशिव सम्नुखनाप्पा गुड्डोडगी आणि अन्य दोघांच्या विरोधात खासगी तक्रार प्रविष्ट केली आहे.

२. देवीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार, तसेच अमावास्येच्या दिवशी सहस्रो भाविक येथे येत असतात. कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच अनेक भाविक श्रद्धा आणि भक्तीभावाने देवीला सोने, चांदी अन् रोख रक्कम दान करतात. देवस्थानच्या संचालकांनी देवस्थानचा कारभार धर्मादाय आयुक्त सांगली यांनी दिलेल्या नियमावलीतील तरतुदीनुसार न करता संचालक मंडळाने सुमारे १५ कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.

३. या संदर्भात देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश शिवाप्पा गणी म्हणाले, देवस्थानमधील सर्व पुजारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत; परंतु तक्रारदार बसवंत्ताप्पा पुजारी यांच्या एकमेव कुटुंबातील पुजारी यांचा गैरकारभार चालू होता. याविरुद्ध देवस्थान समितीने चाप बसवला. याचा राग मनात घेऊन त्यांनी खोटी तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या संदर्भात लवकरच त्यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा नोंद करणार आहोत.

४. याविषयी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तमराव जाधव म्हणाले, न्यायालयाने दिलेला आदेश प्राप्त झालेला आहे. तक्रारदार हे अगोदरच्या देवस्थान समितीचे संचालक होते. याविषयी सखोल चौकशी चालू असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.