१६.२.२०२१ या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. अमित हडकोणकर आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अंतर्गत सेवा करणार्या सौ. अदिती हडकोणकर यांचा विवाह झाला. यानिमित्त सहसाधकांनी त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. श्री. अमित हडकोणकर
१ अ. सेवेची तळमळ : ‘अमित साधारण २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या माध्यमातून सेवा करत आहे. त्याने सेवा चांगल्या प्रकारे शिकून घेऊन सेवेत चांगले प्रभुत्व मिळवले आहे. सेवा वेळेत करण्याचा तो प्रयत्न करतो. वर्षभरात तो आवश्यकता असेल, तेव्हाच सुटी घेतो.
१ आ. मनमोकळेपणा : पूर्वी तो इतर साधकांमध्ये अधिक मिसळत नसे; पण आता तो सर्व साधकांमध्ये मोकळेपणाने मिसळतो.
१ इ. इतरांना साहाय्य करणे : कोरोनाच्या दळणवळण बंदीच्या काळात, तसेच इतर वेळीसुद्धा तो साधकांची वैयक्तिक, अधिकोषाची, तसेच पोस्टाची काही कामे असतील, तर ती करायचा. याविषयी ‘माझ्यासारख्या वयोवृद्धांचा तो आधार आहे’, असे म्हटले, तरी चालेल.
१ ई. नेतृत्व गुण : त्याच्या गावात असलेल्या देवीच्या देवळातील व्यवस्था तो इतरांच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे निभावतो.
२. अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर
२ अ. (पूर्वाश्रमीच्या) कु. अदिती पवार नेहमी हसतमुख असतात. त्या इतरांना साहाय्य करण्यास नेहमी सिद्ध असतात.
विवाहानिमित्त उभयतांना शुभेच्छा !’
– श्री. प्रकाश रा. मराठे आणि सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.२.२०२१)
निर्मळ, सतत उत्साही आणि आनंदी राहून परिपूर्ण सेवेसाठी प्रयत्नरत असणार्या अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर !
१. अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. आनंदी आणि उत्साही : ‘अदिती प्रत्येक कृतीत, मग ती सेवा असो किंवा वैयक्तिक गोष्ट असो, आनंदी आणि उत्साही असते. ‘आश्रमात पणत्या लावणे, मेंदी काढणे असो किंवा अधिवेशनाची सेवा असो, तिचा उत्साह सर्वत्र सारखाच असतो. प्रत्येक गोष्टीत आनंद घेण्याची आणि तो टिकवून ठेवण्याची कला तिच्यात आहे.
१ आ. लेखनकौशल्य आणि शिकण्याची वृत्ती : अदितीचे लिखाणही चांगले आहे. पूर्वी ती दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘नोंद’ हे सदर लिहीत होती. कायदा विभागात आल्यानंतर तिने कायद्याशी संबंधित लेख लिहिण्यासाठी चांगले प्रयत्न केले. ती कोणतीही कृती मनापासून आणि शिकण्याच्या स्थितीत राहून करते. त्यामुळे तिला संतांनी अनेक वेळा खाऊ दिला आहे.
१ इ. दायित्व घेऊन सेवा करणे : कायदा विभागातील सर्व सेवा तिच्यासाठी नवीन असूनही ‘या सेवा माझ्याकडून होतील का ?’, असा विचार करून तिने कधीच एखाद्या सेेवेचे दायित्व झटकले नाही. कोणतीही सेवा आली, तरी ती सेवा परिपूर्ण होण्यासाठी ती धडपडत असते. अधिवक्ता अधिवेशन, शिबिर यांच्या संबंधित सर्व सेवाही ती पुढाकार आणि दायित्व घेऊन करते.
१ ई. अल्प अहं असल्याने साधिकेच्या वागण्याने दुःखी न होणे : तिच्यामध्ये अहं अल्प आहे. त्यामुळे तिची इतरांशी सहज जवळीक होते. काही प्रसंग घडला आणि तिला कुणी काही बोलले, तरी ती अधिक काळ त्यात गुरफटत नाही. लगेच त्या प्रसंगातून बाहेर येते. आम्ही दोघी एकत्र सेवा करतो. मला अनेक प्रसंगांमध्ये राग आला आणि तो अदितीवर व्यक्तही झाला. तिच्या जागी अन्य कुणी असते, तर माझ्या वागण्यामुळे दुखावले जाऊन माझ्याशी बोलणेही टाळले असते. ती मात्र सर्व विसरून ‘काहीच घडले नाही’, अशा प्रकारेे वागते. तिच्या अशा वागण्यामुळे ‘माझ्यातील चिडचिडेपणा आणि राग नियंत्रणात आला आहे’, असे मला वाटते. ‘एखाद्या व्यक्तीला इतका त्रास देऊनही ती कशी चांगली वागते’, हे मला अदितीकडून शिकता आले. त्यानुसार कृती करण्यासाठी मला प्रेरणाही मिळते.
१ उ. भावपूर्ण सेवा करणे : ‘अदिती भावपूर्ण सेवा करते’, असे अनेक प्रसंगांतून लक्षात आले. मध्यंतरी माझ्याकडे आश्रमातील ध्यानमंदिराच्या स्वच्छतेची सेवा होती. एक दिवस मला काही कारणाने ही सेवा करणे जमणार नसल्याने ती सेवा अदितीने केली. तिने स्वच्छतेची सेवा केल्यावर ध्यानमंदिर अधिक शुभ्र आणि हलके वाटत होते. तुलना केली असता माझ्या असे लक्षात आले, ‘अदिती भावपूर्ण सेवा करत असल्याने ध्यानमंदिर अधिक शुभ्र वाटत होते.’ मी स्वच्छता करतांना विचारांमध्ये असल्याने ध्यानमंदिर केवळ स्वच्छ वाटत होते. यातून मला देवाने भावपूर्ण सेवेचे महत्त्व लक्षात आणून दिले.’
२. अधिवक्त्या (सौ.) दुर्गा कुलकर्णी आणि अधिवक्त्या (कु.) सायली ठमके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘जून २०१९ पासून मी (अधिवक्त्या (सौ.) दुर्गा कुलकर्णी) रामनाथी आश्रमात कायदाविषयक सेवा करत आहे. अदिती समन्वयाची सेवा करते. तिच्या समवेत सेवा करतांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या कृपेने लिहून देण्याचा प्रयत्न करत आहे.
२ अ. नम्र आणि मनमोकळेपणाने बोलणे : अदिती नेहमी सर्वांशी नम्रतेने, मनमोकळेपणाने आणि आदराने बोलते.
२ आ. नेतृत्वगुण : अदिती समन्वयाची सेवा मनापासून करते. प्रसंगी वैयक्तिक कामे, महाप्रसाद घेणे, तसेच शारीरिक त्रास बाजूला ठेवून ती प्राधान्य देऊन सेवा करते. तिची शारीरिक क्षमता अल्प असूनही सर्व सेवा पूर्ण करण्याची तिची धडपड असते.
२ इ. अडचणी समजून घेणे : सर्व साधकांच्या अडचणी समजून घेऊन ती साहाय्य करते. त्यामुळे तिला मोकळेपणाने काही सांगतांना ताण येत नाही.
२ ई. उत्तम नियोजनकौशल्य : साधकांची स्थिती, क्षमता आणि त्यांचा उपलब्ध वेळ या सर्वांची पुष्कळ चांगल्या प्रकारे सांगड घालून ती सर्व साधकांना सांभाळून घेऊन आनंदाने अन् उत्साहाने सेवा करते.