|
दोडामार्ग – तालुक्यात भूमी विकत घेतलेले, तसेच भूमी भाडेतत्त्वावर घेऊन तेथे बागायती करणारे परप्रांतीय भूमी मालक आणि कामगार यांची पोलिसांद्वारे चौकशी करावी. अशा लोकांची चौकशी न झाल्यास ‘भारतीय जनता युवा मोर्चा’च्या वतीने परप्रांतियांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘भारतीय जनता युवा मोर्चा’चे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दीपक गवस यांनी तहसीलदार आणि पोलीस यांना एका निवेदनाद्वारे दिली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, तालुक्यात विशेष करून तिलारी, तेरवण-मेढे, शिरंगे, वीजघर या भागांत मोठ्या प्रमाणात परप्रांतियांनी स्थानिक लोकांच्या भूमी विकत घेतल्या आहेत किंवा भाडेतत्त्वावर घेऊन तेथे लागवड केली आहे. काही ठिकाणी भूमीवर अतिक्रमण केले आहे. स्थानिक लोकांना परप्रांतीय भूमीमालक आणि कामगार यांच्याकडून धमकी देण्याचे प्रकार काही वर्षांपासून चालू आहेत. हे कामगार अमली पदार्थांचे सेवन करत असण्याची शक्यता स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. ८ फेब्रुवारी या दिवशी कोनाळचे सरपंच पराशर सावंत यांना अशाच एका परप्रांतियाने काही स्थानिक लोकांना हाताशी धरून धमकी दिली. कोनाळ ग्रामपंचायतीत येऊन सरपंचांना धमकावण्याच्या प्रकारामुळे तालुक्यात परप्रातियांची मुजोरी वाढल्याचा प्रत्यय आला आहे. अशा प्रकारामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी केरळमधील कुविख्यात हत्ती तस्कराचे आत्महत्या प्रकरण, परप्रांतियांकडून मोठ्या प्रमाणात केलेली गांजाची लागवड, अशी अनेक प्रकरणे पैशांच्या जोरांवर दडपण्यात आली आहेत. यावरून हे परप्रांतीय लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात या परप्रांतियांकडून तालुक्यातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवेदन देतांना चेतन चव्हाण, देवेंद्र शेटकर, समीर रेडकर, रामचंद्र मणेरीकर, विष्णु रेडकर, संदेश म्हावळणकर, अजय दळवी आदी उपस्थित होते.