कळमपुरी (जिल्हा हिंगोली) येथील पालिकेच्या उद्यानाला आग लागल्याने खेळण्याच्या साहित्याची हानी

कळमपुरी (जिल्हा हिंगोली) – येथील पालिकेच्या उद्यानामधील वाळलेल्या गवताला आग लागून १० फेब्रुवारी या दिवशी खेळण्याच्या साहित्याची अनुमाने ३ लाख रुपयांची हानी झाली आहे. पालिकेकडून बंद अवस्थेत असलेल्या उद्यानाची देखभाल दुरुस्ती अभावी दुरवस्था झाली होती. काही जणांकडून उद्यान चालू करण्याचीही मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर पालिका प्रशासनाने या ठिकाणी कर्मचार्‍यांची नियुक्ती करून उद्यानातील स्वच्छता करण्यासाठी कर्मचार्‍यांच्या नेमणुका केल्या होत्या. हे कर्मचारी दुपारी जेवणासाठी गेल्यानंतर उद्यानातील वाळलेल्या गवताला अचानक आग लागली. वार्‍यामुळे आग उद्यानाच्या मोकळ्या परिसरात पोचली. अग्नीशमन दलाच्या बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली.