देशातील रस्ते अपघात कोरोनापेक्षा अधिक गंभीर ! – केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी

 ४० सहस्र कि.मी. राष्ट्रीय महामार्गांचा ‘सेफ्टी ऑडिट’मध्ये समावेश !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारतात रस्ते अपघातांकडे गांभीर्याने  न पाहिले जाणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

नवी देहली – रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. भारतानंतर अमेरिका आणि चीन यांचा क्रमांक लागतो. रस्ते अपघातात मरण पावणार्‍यांपैकी १८ ते ४५ वर्षे या वयोगटातील काम करणार्‍या व्यक्तींचे प्रमाण ७० टक्के आहे. देशात दिवसाला ४१५ लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. ही परिस्थिती कोरोना महामारीपेक्षाही अधिक गंभीर आणि पुढील काळात ही परिस्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते. परिवहनमंत्री म्हणून या गोष्टीविषयी मी अतिशय संवेदनशील आणि गंभीर आहे, असे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते आंतरराष्ट्रीय रोड फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये बोलत होते. ‘रस्ते अपघातांचे प्रमाण न्यून करण्यासाठी देशातील ४० सहस्र कि.मी. राष्ट्रीय महामार्गांचा ‘सेफ्टी ऑडिट’मध्ये समावेश करण्यात आला आहे. या महामार्गांचे ऑडिट करून त्यातील चुका आणि उणीवा शोधून काढून त्या सुधारण्यात येतील’, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

गडकरी पुढे म्हणाले की, अनेक रस्त्यांच्या योजना चुकीच्या आणि सदोष असून शेकडो तांत्रिक उणीवादेखील आहेत. त्यामुळे रस्त्यांवर अपघाताचे ‘स्पॉट’ सिद्ध होतात. विकास प्रकल्पाचे नियोजन सक्षम प्राधिकरणाकडून पडताळले जायला हवे आणि त्यात पालट केले पाहिजेत, तटस्थ यंत्रणेकडून हे बघितले गेले पाहिजे.