‘कु. प्रार्थना पाठक, प्रार्थनाची आई सौ. मनीषा पाठक आणि वडील श्री. महेश पाठक या तिघांचीही आध्यात्मिक पातळी ६७ टक्के आहे. एकाच कुटुंबातील सर्वांची आध्यात्मिक पातळी समान असणे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सनातनमध्ये असे एकही उदाहरण नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. प्रार्थना पाठक हिची भावपूर्ण प्रार्थना ईश्वरापर्यंत पोचल्याची तिला आलेली अनुभूती !
‘मागील काही मासांपासून मी (६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना पाठक), माझी आई आणि आजी (आईची आई श्रीमती सुरेखा सरसर) रामनाथी आश्रमात रहात आहोत. माझी पणजी (श्रीमती सरसर यांची आई) पडली आणि ती रुग्णाईत झाली. माझी आई रुग्णाईत असल्यामुळे कुणाला तरी तिच्याजवळ सततच रहावे लागणार होते. आतापर्यंत आजी तिच्याजवळ होती; परंतु आता आजीला पणजीकडे जावे लागणार होते. अशी परिस्थिती निर्माण झाली. आजी गेल्यावर आई आणि मी एकट्याच राहू शकत नव्हतो; परंतु मला रामनाथी आश्रम सोडून घरीही (आम्ही पुणे सेवाकेंद्रात रहातो.) जायचे नव्हते. याला एक पर्याय होता. तो म्हणजे आजीने पणजीकडे जाणे आणि माझ्या बाबांनी रामनाथी आश्रमात आईच्या साहाय्यासाठी आमच्याजवळ रहावयास येणे; पण ‘असे वाटणे म्हणजे स्वेच्छा आहे’, हे माझ्या लक्षात आले; म्हणून मी ध्यानमंदिरात गेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुढील प्रार्थना केली.
‘गुरुदेवा, माझ्या मनात काय आहे, हे तुम्हाला तर माहीतच आहे; पण जर तसे तुमचे नियोजन नसेल किंवा तुमचे दुसरे काही नियोजन असेल, तर ते नियोजन स्वीकारण्यासाठी तुम्हीच मला बळ द्या. माझ्या बाबांनीसुद्धा पुष्कळ त्याग केला आहे. त्यांचीही रामनाथी आश्रमात येण्याची इच्छा पूर्ण करा. न्यूनतम दिवाळी संपेपर्यंत तरी मला येथे राहू द्या ना !’
मी हे आत्मनिवेदन गुरुदेवांना सतत करत होते. ‘बाबा येऊ शकतील का कि मी आणि आई दोघीच इथे रहाणार ?’, असा विचार माझ्या मनात येत असे; परंतु देवाने माझे म्हणणे ऐकले आणि ‘सोलापूरला सेवेत असलेल्या बाबांना रामनाथी आश्रमात येता आले. मला आनंद झाला.’
– कु. प्रार्थना महेश पाठक (वय ९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |