अमेरिकेला सुनवा !

अमेरिकेतील न्यूयॉर्क विधानसभेने ५ फेब्रुवारी हा दिवस काश्मीर अमेरिकन दिवस म्हणून घोषित केला. २१ व्या शतकात वाढत गेलेले भारत-अमेरिका या दोन महासत्तांचे संबंध जागतिक इतिहासाला आश्‍वासक वळण देणारे ठरतात आणि तसेच यापुढेही ठरणार आहेत. हिंदूंना पूरक असलेल्या ट्रम्प शासनाच्या काळात भारत-अमेरिका मैत्री उजळून निघाली आणि डेमॉक्रेटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सत्तेत आल्यावर परत अमेरिका-भारत संबंधाविषयी चर्चा चालू झाल्या. भारताला जवळ करणे, ही अमेरिकेची असाहाय्यता आहे. वेळोवेळी अनेक प्रसंगांतून तिचा भारतद्वेष प्रकट होत असतो. काश्मीर अमेरिकन दिवस साजरा करण्याचा तेथील एका राज्याच्या विधानसभेचा निर्णय हा त्यातीलच एक भाग. अलीकडेच उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस तिची भाची मीना हॅरिस यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट करून भारतविरोधी भूमिका घेतली.

भारत-अमेरिका संबंध

वर्ष १९९० पर्यंत तरी भांडवलशाही अर्थव्यवस्था असणार्‍या अमेरिकेशी समाजवादी अर्थव्यवस्था असणार्‍या भारताचे संबंध वाढू शकले नव्हते. नंतर भारतानेही खासगीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वर्ष २००८ मध्ये वर्चस्ववादी अमेरिकेने भारताला परमाणू करार करणे भाग पाडले. त्यानंतर मोदी शासन आल्यानंतर ऊर्जा आणि सुरक्षा या संदर्भात महत्त्वाचे करार करण्यात आले. सुरक्षा कराराच्या अंतर्गत विमानांसारखी मोठी युद्धसामुग्री भारताने अमेरिकेकडून घेतली आहे. सायबर, तस्करी यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना एकत्रित संपवण्याचे करारही करण्यात आले आहेत. इतकेच काय वर्ष २०१८ मध्ये आतंकवादाला एकत्रित विरोध करण्याचा ठराव करण्यात आला; परंतु न्यूयॉर्क विधानसभेतील सदस्य हे करार सोयीस्कररित्या विसरलेले दिसतात, असे काश्मीर अमेरिकन दिवस पाळण्याच्या निर्णयावरून वाटते. भारताप्रमाणे अमेरिकेतही हिंदुप्रेमी आणि हिंदुविरोधी असे दोन गट आहेत अन् त्यांचेही ध्रूवीकरण आता वेगाने होणार आहे, असे या घटनेवरून लक्षात येते. भारत-अमेरिका संबंधांत मोदी शासन आल्यावर जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पालट झाला. ट्रम्प-मोदी मैत्रीची दवंडी जगभर पसरून तिचा गवगवा झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी आतंकवादाच्या संदर्भात पाकला डाफरणारी आणि भारताची बाजू घेणारी काही विधाने करण्यास आरंभ केला. अगदी कलम ३७० हटवले गेले, तेव्हाही अन्य जगाप्रमाणेच ट्रम्प शासनाने भारताची बाजू घेतली. असे असूनही काश्मीरचा प्रश्‍न निघाला की, मधूनच ट्रम्प यांच्याकडून मी मध्यस्थी करीन, काश्मीरचा प्रश्‍न सोडवा यांसारखी खोडसाळ पाकधार्जिणी विधाने होतच राहिली.

वास्तविक पाकिस्तान आतंकवादी पोसत आहे, हे सार्‍या जगाला ठाऊक आहे. इराणनेही नुकतेच त्यासाठी त्याच्यावर आक्रमण केले. अमेरिकेनेच पूर्वी त्यासाठी दिलेली शस्त्रे आणि पैसा वापरून आतंकवाद वाढवला आहे. पाकला काश्मीर हवे असल्याने आणि तो थेट युद्ध करू शकत नसल्याने त्याने काश्मीर-पाक दिवस साजरा करणे हे शत्रूराष्ट्र म्हणून एक वेळ लक्षात येऊ शकते. गेली ७० वर्षे त्याने चालवलेल्या छुप्या युद्धात भारताची न भरून निघणारी जी अपरिमित हानी झाली आहे, ती अमेरिकेला ठाऊक आहे. काश्मीर हा भारताचा भाग आहे, हेही जगजाहीर आहे. पाक काश्मीरमध्ये आतंकवादी पाठवून भारताशी प्रतिदिन छुपे युद्ध करून भारताला जेरीस आणत आहे, हेही अमेरिकेला ठाऊक आहे. असे असूनही अमेरिकेच्या एका विधानसभेतील १३ सदस्य अशा प्रकारे भारतविरोधी ठराव मांडत असतील, तर याचा अर्थ त्यांना उघड उघड भारतविरोधी आणि पाकप्रेमी, म्हणजेच दुसर्‍या शब्दांत आतंकवादाचा पुरस्कार करणारी भूमिका घ्यायची आहे, असेच यावरून सिद्ध होते. अमेरिकी संसदेत दिवाळीला दिवे लावले जातात, अधिवेशनाचा आरंभ वेदमंत्रपठणाने होतो आणि एका विधानसभेत मात्र भारतविरोधी आणि आतंकवादाला प्रोत्साहन देणारा दिवस पाळण्याचा ठराव होतो, हे विरोधाभासाचे चित्र आहे. वास्तविक भारताच्या अंतर्गत प्रश्‍नावर अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकेच्या एका राज्यातील विधानसभेला कुणी दिला ? उद्या भारतातील २९ राज्यांतील विधानसभांमध्ये अमेरिकेतील गोर्‍यांकडून होणार्‍या वर्णद्वेषाच्या विरोधात एखादा दिवस साजरा करण्याचा निर्णय भारताने घेतला, तर ते अमेरिकेला चालणार आहे का ? याविषयी भारताने अधिक कणखर आणि कठोर भूमिका घेऊन अमेरिकेच्या विधानसभा सदस्यांना चांगलेच फटकारले पाहिजे. भारत जितक्या आक्रमकपणे ही सूत्रे अमेरिकेसमोर उपस्थित करील, तितके देशहिताच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे.

काश्मीर अमेरिकन दिवस

अमेरिकी भारतियांनी भारताची बाजू उचलून धरावी !

अमेरिकेतील जडणघडणीत प्रमुख भूमिका वठवणार्‍या १७ लाखांहून अधिक भारतियांनीही अशा गोष्टींवर विरोधी मतप्रदर्शन करून भारतप्रेम घोषित केले पाहिजे. एकदा का तेथील लोकप्रतिनिधींच्या हे लक्षात आले, तर भारतविरोधी विधानांना आळा बसण्यास मोठे साहाय्य होऊ शकते. भारताबाहेर रहाणार्‍या भारतियांची ही कृती देशाचे ऋण फेडण्यासाठी उपयुक्त ठरेल. अमेरिकी नागरिकांच्या तुलनेत टक्केवारीत भारतीय तिथे अधिक उच्चशिक्षित आणि श्रीमंतही आहेत. भारतीय तिथे स्थानिकांशी आदरपूर्वक आचरण करणारे, कुठलाही त्रास न देता तेथील अनुशासन पाळणारे म्हणून कौतुकास पात्र होतात. शांतीपूर्ण जीवन जगून देशासाठी योगदान देणारे हीच तेथील भारतियांची ओळख आहे, हे अमेरिकी लोकप्रतिनिधींनी विसरता कामा नये. ते विसरत असतील, तर भारतीय त्यांना याची जाणीव करून देऊ शकतात. अमेरिकेतील या आदर्श अल्पसंख्य समूहाने त्याच्या मतांची किंमत लक्षात घेऊन भारताची बाजू उचलून धरली पाहिजे; कमीतकमी भारताचा अवमान किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होणार्‍या गोष्टींना सामाजिक माध्यमांवर निषेधाचा सूर लावला, तर भारतालाही ही बाजू योग्य प्रकारे मांडण्यास साहाय्य होईल. अमेरिकेची वृत्ती ही भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे. त्यामुळे आक्रमकपणे तिला प्रत्युत्तर देत राहिले, तरच ती ताळ्यावर येईल !